‘हायजॅक’सह तीन चोरटे पिंपरीत जेरबंद | पुढारी

‘हायजॅक’सह तीन चोरटे पिंपरीत जेरबंद

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : दुचाकी चोर्‍या करणारा हायजॅक नामक चोरट्यासह तिघांना दरोडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. प्रतीक ऊर्फ हायजॅक योगिराज खडसे (24, रा. लक्ष्मीनगर, येरवडा मुळ रा. वाशिम), रमन मोहन ठाकूर (22, रा. लक्ष्मीनगर, चिंचवड गाव), शुभम गंगाराम पिटेकर (24, रा. मंचर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडाविरोधी पथक उघडकीस न आलेले गुन्ह्याबाबत माहिती घेत होते. त्या वेळी पोलिस नाईक कोकणे आणि कदम यांना माहिती मिळाली की, संत तुकारामनगर, पिंपरी परिसरात एकजण दुचाकी चोरी करण्यासाठी येणार आहे. तसेच, त्याच्या जवळ असलेली दुचाकीदेखील चोरीची आहे. त्यानुसार, पथकाने सापळा रचुन प्रतीक ऊर्फ हायजॅक खडसे याला ताब्यात घेतले. आरोपीने पिंपरी, आळंदी, लोणावळा, चाकण येथून पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

दरम्यान, चिंचवड भागात उपनिरीक्षक महेश भांगे पथकासह गस्त घालत असताना करीत असताना पोलिस नाईक बनकर आणि कांबळे यांना आणखी दोन चोरट्यांची खबर मिळाली. त्यावरून पथकाने सापळा रचून आरोपी ठाकूर आणि पिटेकर यांना अटक केली. त्यांच्याकडून हिंजवडी आणि मंचर येथे चोरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख, उपनिरीक्षक मंगेश भांगे, भरत गोसावी, कर्मचारी महेश खांडे, नितीन लोखंडे, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Back to top button