वीजबिलांचा दरमहा भरणा करणे हे ग्राहकांचे कर्तव्यच! महावितरणने केले आवाहन | पुढारी

वीजबिलांचा दरमहा भरणा करणे हे ग्राहकांचे कर्तव्यच! महावितरणने केले आवाहन

पुणे, पुढारी वृत्तसेवा: वीजबिलांच्या वसूलीवरच महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा अवलंबून आहे. त्यामुळे वीजबिलाची रक्कम किरकोळ असली तरी आता दरमहा वीजबिलांचा नियमित भरणा करण्यास ग्राहकांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरण स्वतः वीजनिर्मिती करीत नाही. तर विविध वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करून ती मागणीनुसार सर्व वर्गवारीतील ग्राहकांना पुरवठा करते. वीजपुरवठा व ग्राहकसेवा देणारी महावितरण कंपनी हीच एक ग्राहक आहे. महावितरणकडून महानिर्मिती तसेच इतर खासगी वीजकंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते. ही वीज उपकेंद्रांपर्यंत आणण्यासाठी महापारेषणला वहन आकार द्यावा लागतो. या सर्वांचे पैसे वीजग्राहकांनी भरलेल्या वीजबिलांच्या रकमेतून दिले जातात. त्याचप्रमाणे वसूल केलेल्या वीज बिलांमधील सुमारे 80 ते 85 टक्के रक्कम ही वीजखरेदी, पारेषण खर्च आदींवर खर्च होते. त्यानंतर कंत्राटदारांची देणी, नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचार्‍यांचे वेतन, कार्यालयीन खर्च, विविध कर, दैनंदिन देखभाल, दुरुस्तीचे कामे आणि व्याजासह कर्जांचे हप्ते अशी दरमहा देणी द्यावी लागत आहेत.

वीजबिल म्हणजे नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा ठराविक किंवा निश्चित केलेला शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर नाही. वीजबिल म्हणजे ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे शुल्क आहे. वीज जोडणी घेतलीच नाही तर वीजबिल किंवा विजेचे शुल्क भरण्याचा प्रश्नच नाही. तसेच वीज जोडणी घेतल्यानंतरही विजेचा वापर केला नाही, तर केवळ स्थिर आकारच भरावा लागतो. त्यामुळे अत्यावश्यक असलेल्या विजेचा वापर वीजग्राहकांकडून होत असताना त्यापोटी आलेले विजेचे शुल्क म्हणजेच वीजबिल आहे व ते दरमहा नियमित भरणे हे गरजेचे आहे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Back to top button