पुणे: खडकीतील ज्ञानेश्वर घाटावर प्रेमी जोडप्यांचा वावर, सुरक्षा यंत्रणा नसल्याने अश्लील चाळ्यांना ऊत | पुढारी

पुणे: खडकीतील ज्ञानेश्वर घाटावर प्रेमी जोडप्यांचा वावर, सुरक्षा यंत्रणा नसल्याने अश्लील चाळ्यांना ऊत

खडकी, पुढारी वृत्तसेवा : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये जुन्या होळकर पुलाजवळील ज्ञानेश्वर घाटावर जोडप्यांचा वावर वाढला आहे. गणपती विसर्जनाच्या धार्मिक स्थळावर आता जोडप्यांच्या प्रेमलीलांना ऊत आला आहे. बोर्ड आणि पोलीस प्रशासनाचे लक्ष नसल्याने जोडप्यांचे फावत असून या ठिकाणी जोडप्यांना अटकाव करण्यात यावा. तसेच सुरक्षा रक्षक तैनात करावेत, अशी मागणी खडकीकर करीत आहेत.

बोर्डाच्या हद्दीत होळकर पुलाजवळ मुळा नदी काठी ज्ञानेश्वर घाट असून घाटावर गणपती आणि दुर्गा देवीचे विसर्जन करण्यात येते. तसेच घाटावर काही नागरिक दहाव्या सारखे काही धार्मिक विधी देखील करतात. मात्र, या ठिकाणी प्रेमी युगलांचा वावर वाढला आहे. अनेक जोडपे घाटावरच्या पायऱ्यांवर बसून दिवसाढवळ्या अश्लील चाळे करताना नजरेस पडतात. घाटावर बसण्यासाठी बोर्ड प्रशासनाने लहान उद्यान देखील केले असून या ठिकाणी असलेल्या झाडे आणि आडोश्यात अनेक जोडपे बसतात.

घाटावर नागरिकांचा वावर नसल्याने जोडप्यांचे फावत असून अनेक जोडपे अश्लील चाळे करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले. घाटावर सकाळी तसेच दुपारी महाविद्यालयीन युवक युवतींचा वावर वाढला आहे. घाटाच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक दुचाक्यांची रीघ लागलेली असते.

ज्ञानेश्वर घाटाजवळ राजीव गांधी उद्यान असून उद्यानाची वेळ सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी चार ते साडे सहा इतकी आहे. उद्यानाच्या वेळेनंतर अनेक जोडपे घाटावर बसत असून रात्रीच्या अंधाराचा फायदा उचलत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ज्ञानेश्वर घाटावर धार्मिक स्थळ असलेल्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. प्रशासनाने धार्मिक स्थान असल्याने जोडप्यांना अटकाव करण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.

खडकी बोर्डाच्या हद्दीमधील उद्यानामध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत, मात्र ज्ञानेश्वर घाटावर सुरक्षा रक्षक नाहीत. घाटाची रंगरंगोटी तसेच सुशोभीकरण करण्यात आले आहे, प्रेमी जोडप्याना अटकाव करण्यासाठी लवकरच काही मार्ग काढण्यात येईल.

शिरीष पत्की, उद्यान अधीक्षक

Back to top button