बारामतीत फसवणूकीचे मोठे रॅकेट: दुप्पट पैसे देतो, असे सांगून फसविणाऱ्याला अटक; एक साथीदार फरार | पुढारी

बारामतीत फसवणूकीचे मोठे रॅकेट: दुप्पट पैसे देतो, असे सांगून फसविणाऱ्याला अटक; एक साथीदार फरार

बारामती, पुढारी वृत्तसेवा: तुमच्याकडील पैसे दुप्पट करून देतो, तुमच्याकडे दोन नंबरचा पैसा असेल तर तो ही दुप्पट करून देतो, अशी बतावणी करत फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रसाद संजय टकले (वय २६, सध्या रा. प्रगतीनगर, शेळकेवस्ती, बारामती, मूळ रा. अहमदनगर) याला शहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या फसवणूक रॅकेटमागे गौतम पाटील नावाचा व्यक्ति मास्टरमाईंड असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने फसवणूकीचा प्रकार घडणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. सांगली जिल्ह्यातील पलूस येथील दिलीप ईश्वरा सावंत (वय ६७) यांना टकले याने फोन करत तुम्ही जेवढे पैसे आणाल त्याच्या दुप्पट पैसे देतो, माझ्याकडे ही रक्कम काळ्या कोटींगमधून तस्करीतून आली आहे, असे सांगितले होते. वेळोवेळी फोन करत त्यांना विश्वास देण्यात आला होता. सावंत यांचा मुलगा इंजिनिअर असून तो सध्या बेरोजगार आहे. त्यामुळे कमी कष्टात अधिक पैसे मिळाले तर बरे, हा विचार दिलीप सावंत यांनी केला आणि ते या सापळ्यात अकडले. या भामट्याने त्यांना बारामतीत फलटण रस्त्यावर भेटीसाठी बोलावले. परंतु तेथे त्यांची भेट घेतली नाही. तत्पूर्वी नातेपुते, फलटण येथेही बोलावून घेतले होते, परंतु तेथेही भेट घेतलेली नव्हती.

अखेर त्यांच्या भेटीचा दिवस ठरला. सावंत यांनी येताना ३ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम दुप्पट करून घेण्यासाठी आणली होती. यावेळी एक भामटा एका बॅगेमध्ये वह्या तर दुसऱ्या बॅगेत नोटांचे बंडल घेऊन मोटारीतून (एमएच- ०९, बीबी-४३०७) आला. त्याने रस्त्यातच डिक्कीतील दोन्ही बॅगा फिर्यादीला दाखवल्या. यात लाखो रुपये आहेत, तुम्ही द्याल त्याच्या दुप्पट रक्कम देतो, असे सांगण्यात आले. यावेळी हे दोघेही एकमेकांना अजमावत होते. तुम्ही आणलेले पैसे द्या, लगेच दुप्पट पैसे देतो असे भामटा सांगत होता तर तुम्ही बॅग खोलून पैसे मोजून दाखवा, असे सावंत म्हणत होते. शहरातील फलटण रस्त्यावर हा प्रकार सुरु असताना शहर पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकत सावंत यांच्यासह त्यांचा मुलगा व आणखी एकाला पोलिस ठाण्यात आणत चौकशी केली.

टकले याच्याकडील बॅगची तपासणी केली असता बॅगेमध्ये प्रथमदर्शनी नोटांचे बंडल दिसून आले. परंतु, बारकाईने पाहणी केली असता शंभर, पाचशे रुपयांच्या नोटांची एक गड्डी व अशा एकत्र बांधलेल्या दहा ते बारा गड्डींचा एक गठ्ठा असे चार गठ्ठे व त्यावर पाचशे रुपयांची एक खरी नोट लावण्यात आली होती. आतमध्ये नोटांचे झेराॅक्स तसेच लहान मुलांच्या खेळण्यातील नोटांचा समावेश होता. पोलिसांनी टकले याचा हा फसवणूकीचा प्रयत्न उधळून लावला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता गौतम पाटील नावचा व्यक्ती या फसवणूकीमागचा मास्टरमाईंड असल्याचे समोर आले. तो टकले याच्या मोबाईलद्वारे संपर्कात होता. पोलिसांनी टकले याला पकडल्यामुळे तो पसार झाला. गौतम पाटील याचे नावही बनावट असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

Back to top button