पुणे : अंथुर्णेतील मुख्य रस्त्यावर साचले सांडपाणी ; गटारलाईन फुटल्याने परिसरात दुर्गंधी | पुढारी

पुणे : अंथुर्णेतील मुख्य रस्त्यावर साचले सांडपाणी ; गटारलाईन फुटल्याने परिसरात दुर्गंधी

वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा :  अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू असताना बाजूने असलेली गटारलाईन फुटली असून, मुख्य चौकामध्येच सांडपाणी साचले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागासह ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गेल्या 10-12 दिवसांपूर्वी अंथुर्णे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात रस्त्याच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना जुन्या रस्त्याच्या बाजूने गेलेली बंदिस्त गटार फुटली. त्यामुळे या गटारीतील सांडपाणी रस्त्यावर साचले असून, त्याची दुर्गंधी सुटली आहे.

या गटारीतून प्रभाग क्रमांक 4 मधील सांडपाणी व शौचालयाचे पाणी जात असते. मात्र, गटार मध्येच फुटल्याने वाहून जाणार्‍या पाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, अनेक नागरिकांच्या शौचालयाचे पाणी थांबून राहू लागले आहे. तर, ज्या ठिकाणी गटार फुटली आहे, त्या ठिकाणीदेखील पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तातडीने गटार दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रभाग तीनमध्येही हीच परिस्थिती
गावातील प्रभाग 3 मधील गटारलाईन गेल्या तीन-चार वर्षांपासून नादुरुस्त आहे. तेव्हापासून येथील इंदापूर-बारामती रस्त्यालगत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाशेजारील नागरीवस्तीच्या बाजूलाच गटारीचे घाण पाणी साचत आहे. याबाबत येथील स्थानिकांनी शेकडो वेळा तक्रारी करूनही त्याची दुरुस्ती झाली नाही. आता नवीन रस्त्याच्या कामात पुन्हा तीच लाईन फुटल्याने येथील नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

Back to top button