पुणे : पडलेले दर, अवकाळीने द्राक्ष कवडीमोल | पुढारी

पुणे : पडलेले दर, अवकाळीने द्राक्ष कवडीमोल

कळस : पुढारी वृत्तसेवा : कळस (ता. इंदापूर) येथील कांद्यासह भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाच द्राक्ष उत्पादकही कवडीमोल दर व अवकाळी पावसामुळे हवालदिल झाले आहेत. द्राक्षांचा दर 25 ते 30 रुपये किलो दराच्या पुढे व्यापारी नेण्यास तयार नाहीत. आता रद्दीही 30 ते 40 रुपये किलोने विकली जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
इंदापूर तालुक्यातील बिरंगुडी, बागवाडी, पिलेवाडी, गोसावीवाडी आदी परिसरात द्राक्षांच्या बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, विक्रीला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करत होते.

आता त्यात अवकाळी पावसाची भर पडली आहे. वादळी वारे, अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या ढगाळ वातावरण कायम असून, रोगराईचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. यामध्ये शेतकर्‍यांचा मोठा खर्च होत आहे.

तर दुसरीकडे बाजारात द्राक्षांचे भावदेखील उतरलेले आहेत. प्रारंभी बाजारपेठेत द्राक्षास उठाव नसल्याच्या कारणावरून व्यापारी द्राक्षबागा घेण्याचे टाळत होते. मात्र, अवकाळीनंतर शेतकर्‍यांच्या झालेल्या मानसिकतेचा फायदा घेत कमी भावाने व्यापारी द्राक्षांची मागणी करत आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान होऊ नये याकरिता शेतकरी आपल्या बागांमधील माल विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवून मोकळे होताना दिसत आहेत. त्यामुळे द्राक्षांचे दर मोठ्या प्रमाणावर गडगडलेले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी द्राक्षास समाधानकारक दर मिळेल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती, मात्र ती फेल ठरली आहे. द्राक्षांचा दर 25 ते 30 रुपये किलो दराच्या पुढे सरकत नाही.
यंदा औषधे, खतांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर मजुरीही दुप्पट वाढली आहे. कोसळलेले दर, अवकाळी पाऊस आणि शासनाचे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांबाबत असलेले उदासीन धोरण यांसह विविध समस्यांच्या दृष्टचक्रात द्राक्ष उत्पादक शेतकरी सापडला आहे.

Back to top button