मंचर : पुढारी वृत्तसेवा : आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना वार्यावर सोडून देणारा मुलगा व सुनेवर पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद एकनाथ सीताराम वळसे यांनी दिली. याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरगुडसर वळसेमळा (ता. आंबेगाव) येथील हनुमंत एकनाथ वळसे व सून सुनीता हनुमंत वळसे यांनी फिर्यादी एकनाथ वळसे व त्यांची पत्नी अनुसया वळसे यांचा सांभाळ व संरक्षणाची जबाबदारी असताना त्यांनी त्यांचा सांभाळ व संरक्षण न करता घरामधून बाहेर काढले. या मुलाने मुंबई येथे खोली घेण्यासाठी व निरगुडसर येथे घर बांधण्यासाठी फिर्यादी एकनाथ वळसे यांच्याकडून 1 लाख 35 हजार रुपये घेऊन ते परत न करता शिवीगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पारगाव पोलिसांनी सून व मुलावर माता-पिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अधिनियमन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस जवान कीर्वे करीत आहेत.
नागरिकांनी आपल्या वयोवृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करावा, त्यांना वार्यावर सोडू नये. आई-वडिलांचा छळ, त्यांना घराबाहेर काढणार्या मुलगा व सुनेबाबत तक्रार आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.
– लहू थाटे, सहायक पोलिस निरीक्षक, पारगाव