पुणे : मैत्रिणीला भेटून येते सांगून नववधू पळाली

पुणे : मैत्रिणीला भेटून येते सांगून नववधू पळाली
Published on
Updated on

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा :  दिवसेंदिवस लग्न जमविणे हा धोकादायक प्रकार होत चालला आहे. शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात अशीच घटना घडली आहे. लग्नानंतर वधूला पहिल्यांदा माहेरी सोडायला जात असताना वधूने मैत्रिणीला भेटून येते, असे सांगून चक्क पलायन केले. वरपक्षाची फसवणूक झाल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. लग्न जमविणार्‍या मध्यस्थांनी बाजारच सुरू केला आहे. शिरूरच्या पूर्व भागातील एका कुटुंबाकडून अशाच मध्यस्थांनी रोख रक्कम घेऊन त्यानंतर लग्नही लावून दिले. वधू, वर देवीचे दर्शन करून परत आल्यानंतर वधूला माहेरी सोडण्यासाठी गेले.

मात्र, रस्त्यावरच गाडी थांबविण्यास सांगून वधूने मैत्रिणीला भेटून येते, असे सांगितले. नंतर त्या ठिकाणावरून वधूने धूम ठोकली. वधू लवकर का येईना? हे पाहायला गेल्यावर संबंधित कुटुंबाला आपली फसवणूक झाल्याचे समजले. परिणामी, मध्यस्थी करून लग्न जमविणार्‍यांवर कितपत विश्वास ठेवायचा, हे अवघड होऊन बसल्याचे कुटुंबाने सांगितले.

माहेरी जाताना या वधूने कोणालाही माहीत न होता आपल्या बॅगमध्ये दागिने, नवीन महागड्या साड्या, कपडे घेतले. दरम्यान, सासरकडून निघाल्यानंतर गावाजवळ पोहचत असताना नवरी मैत्रिणीला साड्या दाखवून येते, असे म्हणत गाडीतील बॅग घेऊन खाली उतरली व पुन्हा आलीच नाही. इकडे वराकडील मंडळी गाडीजवळ वधू कशी येईना? म्हणून वाट पाहत होती. चौकशी केली असता वधू पळून गेल्याचे लक्षात आले. जवळचे नातेवाईक व मध्यस्थांपैकी कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही.

अखेर सर्वांनाच माघारी परतावे लागले. झालेल्या प्रकाराने मुलाला व कुटुंबीयांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. मुलाकडील कुटुंबीयांनी बदनामी होईल, या भीतीने अद्याप तक्रार दाखल केली नाही. सध्या फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असून, अशा मध्यस्थांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news