नवीन घर घेताय ? या बाबी जरूर लक्षात ठेवा…

नवीन घर घेताय ? या बाबी जरूर लक्षात ठेवा…
Published on
Updated on

पुणे : घर खरेदी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते. तोपर्यंत ठरलेला व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकेतून अथवा फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले जाते. सदनिका खरेदी करताना जागा मालकापासून ते क्षेत्रफळ, मिळणार्‍या सुविधा, कुलमुखत्यारपत्र कोणाला देण्यात आले आहे, ताबा कधी मिळणार आहे, अशी विविध माहिती तपासून घेणे आवश्यक आहे.

गुंतवणूक ज्या प्रकल्पात करीत आहात, त्याची 'महारेरा'च्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख असल्याची खात्री करून घ्या. घर नोंदणी-खरेदी करताना 10 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम देत असल्यास विकसकाला घरखरेदी करार करणे आवश्यक आहे. नोंदणीनंतर दिल्या जाणार्‍या नोंदणीपत्रात सदनिका क्रमांक, चटईक्षेत्र, पार्किंग तपशील, एकूण किंमत ही माहिती आहे ना, याची खात्री करून घ्या.
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने
(महारेराने) जारी केल्या मार्गदर्शक सूचना…

इमारत ज्या जागेवर बांधण्यात आली किंवा येणार आहे, त्याचा 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड किंवा बी फॉर्म, यावर धारक म्हणून नावे असलेल्या सर्व व्यक्तींनी विकसकास कुलमुखत्यारपत्र दिले आहे का, हे पाहावे.

कुलमुखत्यारपत्र रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे.

जागेचा सर्च घेतला आहे का व सर्च रिपोर्ट तपासावा. विकसकास दिलेले अधिकारपत्र पाहावे.

प्लॉटचे पूर्ण अधिकार, पार्ट अधिकार आहेत का, ते तपासावे. जागा विकसकाच्या प्रत्यक्ष ताब्यात आहे का, हे पाहावे. बांधकामाचे नकाशे महापालिका किंवा जिल्हाधिकारी यांनी मंजूर केले आहेत का, हे पाहावे.

मान्य नकाशामध्ये विकत घेण्यात येणारा फ्लॅट आहे का, हे पाहावे. फ्लॅटचा मजला व क्रमांक यांची खात्री करावी, विभागणी केलेला फ्लॅट नाही ना, याची खात्री करावी.

एन.ए. परवानगी घेतली आहे का, हे पाहावे. फ्लॅट विक्रीस बंधने आहेत का, हे पाहावे. मान्य नकाशातील अटी तपासाव्यात.

फ्लॅटच्या क्षेत्राचा कार्पेटमध्ये उल्लेख हवा. ओपन प्रायव्हेट टेरेस क्षेत्राचा वेगळा उल्लेख हवा. ताब्याची मुदत, तारीख करारनाम्यात हवी. उशीर झाल्यास नुकसानभरपाई उल्लेख हवा. मेंटेनन्स खर्च एकरकमी की दर वर्षी द्यायचा, याची माहिती घ्यावी. करारनामा रजिस्टर्ड करावा.

ताबा घेताना घ्यावयाची काळजी ः महापालिका हद्दीत असल्यास भोगवटापत्र हवे. भोगवटापत्र नसताना ताबा घेणे बेकायदेशीर नाही; परंतु जागेचा वापर सुरू करणे बेकायदेशीर ठरेल व तसा वापर चालू केल्यास मनपाकडे तडजोड फी भरावी लागते. मनपा कर आकारणी झाली आहे की नाही, याची खात्री करावी. जमीन व इमारतीचे खरेदीखत केव्हा होणार, याबाबत विकसकाकडून हमी घ्यावी. सोसायटी होणार की अपार्टमेंट होणार, याची माहिती घ्यावी. प्रत्यक्ष खरेदीखत होईपर्यंत मेंटेनन्स कोण करणार, याची माहिती घ्यावी. प्रकल्पांची सविस्तर माहिती महारेराच्या https://maharera.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news