

बारामती; पुढारी वृत्तसेवा : खेळाडूंसाठी सरावाचे सातत्य, मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे मत अहमदनगरच्या जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले- कसगावडे यांनी व्यक्त केले. येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात नुकताच वार्षिक क्रीडा नैपुण्य पारितोषिक वितरण समारंभ जल्लोषात पार पडला, या वेळी त्या बोलत होत्या. विविध खेळात विशेष यश संपादन केलेल्या तब्बल 170 खेळाडू विद्यार्थी, विद्यार्थिनींचा पारितोषिक, ट्रॅकसूट आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
महाविद्यालय, प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांकडून 64 हजार रुपयांची रोख पारितोषिके खेळाडूंना देण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य चंद्रगुप्त शाह वाघोलीकर हे होते. पुण्याचे क्रीडा उपसंचालक महादेव कसगावडे हे उपस्थित होते. महादेव कसगावडे यांनी त्यांचा खेळाडू ते क्रीडा उपसंचालकपदापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला.
शासनाने क्रीडा क्षेत्रात यश संपादन केलेल्या खेळाडूंसाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. खेळाडूंनी त्याकरिता प्रयत्न केले पाहिजे, असे सांगितले. वाघोलीकर यांनी विजेत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. एशिया-ओशियाना कॉर्फबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल प्रणव पोमणे, दक्षिण आशियाई कराटे स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल मंथन भोकरे अशा विविध स्पर्धेत विशेष यश संपादन केलेल्या अनेक खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी केले. क्रीडा पारितोषिक अहवालाचे वाचन जिमखाना विभागाचे प्रमुख डॉ. गौतम जाधव व डॉ. अशोक देवकर यांनी केले.