लोणी-धामणी : बैलगाडा शर्यतीमुळे रोजगार निर्मिती | पुढारी

लोणी-धामणी : बैलगाडा शर्यतीमुळे रोजगार निर्मिती

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिल्याने गावागावांतील बैलगाडा शर्यती सुरू झाल्या आहेत. परिणामी, अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांना चालना मिळाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास प्रारंभ झाला आहे. बैलगाडा शर्यतीमुळे बैलगाडा मालक, बैलांचे छोटे-मोठे व्यापारी, वाहन व्यावसायिक, आईस्क्रीम विक्रेते, गुर्‍हाळ चालक, खेळणी विक्रेते, भेळवाले, ओली भेळवाले, थंड पाण्यावाले, लस्सी विक्रेते, गाडा तयार करणारे कारागीर, खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, वाजंत्री, बॅन्जोवाले आदी घटकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला आहे. बैलगाडा शर्यतीसाठी लांब लांबून पाहुणे येत असतात.

त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर गोड-तिखट स्वयंपाक बनवला जात असतो. त्यासाठी किराणा व्यावसायिकांची गरज भासते. सुतार, वेल्डिंग काम करणारे, गाडा बनविणारे, वेसण, मोरखी, पट्टेवाले, मोरपीस कारागीर यांचा मोठा सहभाग असतो. शर्यतीदरम्यान हॉटेल व्यावसायिक, आईस्क्रीमवाले, गुर्‍हाळवाले, फळ विक्रेत्यांकडेही ग्राहक मोठ्या प्रमाणावर येत असतात. साहजिकच त्याचा फायदा गावातील अर्थव्यवस्थेवर होत असतो. शर्यतीदरम्यान वाजंत्री मंडळींनाही मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतो. साहजिकच बैलगाडा शर्यतीमुळे गावोगावांतील व्यवसाय पुन्हा एकदा उभे राहू लागले आहेत. गावच्या ओस पडणार्‍या यात्रा-जत्रांना आता मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे.

डिजिटल युगात नव्या रोजगारांची निर्मिती
डिजिटल युगात आता या शर्यतीदरम्यान अनेक बैलगाडा मालक आपल्या गाड्याचे चलचित्रण करण्यासाठी व्हिडिओ ग्राफर, फोटोग्राफर यांनाही बोलवतात. त्यामुळे त्यांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच माध्यम प्रतिनिधी, बैलगाडा शर्यतीचे लाईव्ह प्रक्षेपण करणार्‍यांनाही रोजगार मिळाला आहे. शर्यतीसाठी गावोगावावरून बैलांना आणि माणसांना घेऊन जाणार्‍या वाहनचालकांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.

Back to top button