मुरुमाअभावी आळेफाटा बायपास रखडला | पुढारी

मुरुमाअभावी आळेफाटा बायपास रखडला

आळेफाटा; पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा येथे बाह्यवळणाचे काम मुरुमाअभावी रखडले आहे. बाह्यवळणावरील अर्धवट अवस्थेतील उड्डाण पूल राज्य सरकारचे नवीन धोरण घोषित झाल्यानंतरच सुरू होणार असल्याचे समजते. राज्य सरकारच्या महसूल धोरणामुळे आळेफाटा बाह्यवळणावरील उड्डाण पूल अर्धवट असल्याने आळेफाटा चौकात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. बाह्यवळणाचे काम मार्गी लावावे, अशी मागणी वाहनचालक, तसेच प्रवाशांनी केली आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, कळब, नारायणगाव, आळेफाटा बायपासचे काम गेली सहा वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने रखडले होते. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत होती. लोकसभा निवडणुकीतही हा कळीचा मुद्दा ठरला होता. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात खेड, मंचर, कळंब, नारायणगाव बायपासच्या कामाला चालना मिळाली. स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.

आळेफाटा बाह्यवळणाचे काम संथगतीने सुरू असून, कल्याण-नगर महामार्गावरील उड्डाण पुलाचे काम उत्तरेकडील पूर्ण झाले आहे. दक्षिणेकडील काम मोठ्या प्रमाणात बाकी आहे. दक्षिणेकडील उर्वरित कामाला जुन्नर तालुक्यात मोठ्याप्रमाणात मुरूम उपलब्ध होत नाही. त्यातच राज्यातील नवीन सरकारच्या महसूल धोरणामुळे लगतच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून मुरूम वाहतुकीसाठी परवानगी दिली जात नाही. संबंधित अधिकार्‍यांकडून विधानसभेत महसूल धोरण जाहीर झाल्यानंतरच परवानगी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे उड्डाणपुलाच्या भरावासाठी मुबलक मुरूम उपलब्ध होत नाही. अंतर्गत रस्ते व इतर कामेही थंडावली आहेत. त्यामुळे अजून काही काळ बाह्यवळण पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

Back to top button