थेरगावात पार पडला शून्य कचराविरहित विवाह | पुढारी

थेरगावात पार पडला शून्य कचराविरहित विवाह

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात एक अनोखा विवाहसोहळा नुकताच पार पडला. बेसिक्स संस्थचे कर्मचारी विशाल मिठे यांनी आपल्या बहिणीच्या विवाह सोहळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही, याची काळजी घेत एक आदर्श घालून दिला. विवाह सोहळ्यात प्लास्टिकचा वापर करण्यात आला नाही.

उपस्थितांना सांगितले स्वच्छतेचे महत्त्व
पवारनगर, थेरगाव येथील एका मंगल कार्यालयातील विवाह समारंभात एकीकडे मंगलाष्टके व दुसरीकडे एका संस्थेचे प्रतिनिधी स्वच्छतेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. लग्नसोहळ्याला उपस्थित मान्यवरांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. संपूर्ण विवाह समारंभात प्लास्टिक तसेच, कागदी ग्लास किंवा प्लेटचाही वापर केला गेला नाही. तसेच, स्वच्छतेसंदर्भातील फलक लावण्यात आले होते. कचरा व प्लास्टिकविरहीत असा हा विवाहसोहळा पार पडला.

या अनोख्या उपक्रमाचे उपस्थित पाहुणे मंडळींनी कौतुक केले. या वेळी माजी महापौर उषा ढोरे, सहायक आरोग्यधिकारी महेश आढाव, बाबासाहेब कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश पाटील, आरोग्य निरीक्षक प्रणय चव्हाण आदी उपस्थित होते. या उपक्रमासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते विशाल मिठे यांनी सांगितले की, पुढील काळात शहरातील सर्वच मंगल कार्यालयांत प्लास्टिकचा वापर बंद करण्याबाबत मंगल कार्यालयचालकांना विनंती करण्यात येणार आहे. कचरा विलगीकरणासोबतच प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याबाबत प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Back to top button