मोशी : महामार्गावर राँगसाईडने वाहने सुसाट; पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष | पुढारी

मोशी : महामार्गावर राँगसाईडने वाहने सुसाट; पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष

मोशी : पुणे-नाशिक महामार्गावर मोशीत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणारी वाहने वाहनाचालकांची डोकेदुखी ठरत आहेत. अचानक समोर आलेल्या वाहनाला वाचविताना गंभीर अपघात घडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राँगवे ने येणारी वाहने सुसाट असून, त्यांच्यावर कारवाई करण्याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

वाहन चालविताना चालकांची कसरत
पुणे-नाशिक महामार्गावर वाहने चालविणे चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. विरुद्ध दिशेने वाहने येत असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. या विरुद्ध दिशेच्या वाहतुकीला खतपाणी मिळत असून, जो तो ज्याला वाटेल त्या दिशेने वाहने रस्त्यावर आणत आहे. यामुळे महामार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना वेगाला अचानक ब्रेक लावावा लागत आहे. रात्रीच्या वेळी समोरून आलेले वाहन वाचविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

वाहतूककोंडीने चालक त्रस्त
भारत माता चौक तर विरुद्ध दिशेने येणार्‍या वाहनांचे आगार असून, येथील वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ही राँगवे ने येणारीच वाहने आहेत. नागेश्वरनगर बाजूने येणारी चारचाकी, दुचाकी वाहने यांची एक रांगच विरुद्ध दिशेने लागत असून, यामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. तसेच, यामुळे मुख्य प्रवाहातील वाहने अडकून पडलेली दिसून येतात.

नागरिकांची कारवाईची मागणी
मोशीसारख्या उपनगरात रुग्णालये, महाविद्यालये, शाळा मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे रस्त्यावर लहान मुले, महिला, वयोवृद्ध यांची सतत रहदारी असते. यामध्ये अचानक विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांमुळे पादचारी भयभीत होतात. कधी-कधी अपघातग्रस्त होतात. यामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष न करता संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. एकंदरीतच विरुद्ध दिशेने येणारी वाहने वाहनचालकांची डोकेदुःखी बनत असून, येथे महामार्गाला सर्व्हिस रस्ता नसल्याने हे प्रकार घडत आहेत.

अपघातात वाढ
मोशीतील मुख्य चौक, नागेश्वरनगर परिसर, देहू रस्ता परिसर, शिवाजीवाडी, टोलनाका, बोर्‍हाडेवाडी रस्ता, आदर्शनगर रस्ता येथून वाहने थेट मुख्य महामार्गावर येत असून, ते विरुद्ध दिशेनेच प्रवास करताना दिसून येतात. या वाहनांचा मोठा फटका पायी चालणारे आणि रस्ता ओलांडणारे प्रवाशी यांना बसत आहे. विरुद्ध दिशेने आलेले वाहन न दिसल्यामुळे अपघात झाल्याच्या कित्येक घटना गेल्या वर्षभरात घडल्या आहेत.

Back to top button