पिंपरी : टपाल अपघात विमा झाला सामान्यांचा आधार | पुढारी

पिंपरी : टपाल अपघात विमा झाला सामान्यांचा आधार

मिलिंद शुक्ल

पिंपरी : सध्याच्या धकाधकीच्या जगात अपघाताचे प्रसंग अनेकदा उद्भवण्याची भीती असते. अशा वेळी विम्याचा मोठा आधार होतो. परंतु हा विमा जर कमी पैशात भरवशाचा असेल तर मोठा दिलासा मिळतो. मात्र, अशात टपाल अपघात विमा हा सामान्यांचा आधार ठरतोय. कारण 299 किंवा 399 रुपये प्रतिवर्ष भरून तुम्हाला 10 लाखांचे अपघातकवच मिळणार आहे.

या योजनेतील अपघाती विमा हा थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे. यासाठी टाटा एआयजी आणि बजाज एआयजी या दोन कंपन्यांचे सहकार्य आहे. यातील टाटा यांचा विमा हा क्लेमवर आधारित आहे. अपघात झाल्यानंतर ते पूर्ण उपचार झाल्यानंतर क्लेम दाखल केल्यानंतर परतावा मिळतो. मात्र, बजाजच्या विम्याअंतर्गत त्यांच्याशी सलग्न दवाखाना किंवा रुग्णालये आहेत, तेथे उपचार घेतल्यास तो कॅशलेस होतो. येथे रुग्ण दाखल होऊन पूर्ण उपचार होईपर्यंतचा सर्व खर्च या विम्यातून कॅशलेस पद्धतीने केला जातो.

असा काढाल विमा…
18 ते 65 या वयोगटातील नागरिकांना जवळच्या टपाल कार्यालयात हा विमा घेता येऊ शकतो. मात्र, यासाठी पोस्ट पेमेंट बँकेचे बचत खाते असावे लागते किंवा ते ऐनवेळीही काढून विमा घेता येतो. जर पोस्ट पेमेंट बँकेच्या आयपीपीबी मोबाईल अ‍ॅपवर जर खाते उघडले असेल, तर त्याचे केवायसी जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन करून घ्यावे. केवायसी नसलेले खाते डीअ‍ॅक्टिव्ह होऊ शकते. तसेच हे खाते उघडण्यासाठी आणि विमा यासाठी फक्त आधारकार्ड हे एकच कागदपत्र लागते. पेमेंट बँकेच्या खात्यात 399 आणि बचत खात्यासाठीचा बॅलन्स 100 असे 499 रुपये ठेवावेत. यासाठी तुम्ही पोस्टमन आणि पोस्ट ऑफिसातील कर्मचार्‍यांची मदत घेऊ शकतात.

मिळणारे फायदे
सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फरशीवरून घसरून पडून मृत्यू, पाण्यात पडून मृत्यू या प्रकारच्या अपघातांचाही समावेश आहे. त्याचबरोबर अंत्यसंस्कारासाठी 5000 रुपये आणि किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल. विमाधारक व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये. विमाधारकास कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये. विमा योजना दवाखान्याचा खर्च करण्यासाठी 60 हजार रुपये. विमाधारकास हॉस्पिटलमध्ये दाखल केले असेल तर दररोज 1 हजार रुपये प्रतिदिवस असे 10 दिवसांपर्यंत बिल मिळते. विमाधारकास ओपीडी खर्च हा 30000 रुपये. विमाधारकास पॅरालिसीस झाल्यास त्यास 10 लाख रुपये. विमाधारक व्यक्तीचा कुटुंबास दवाखानात प्रवासासाठी प्रवास खर्च म्हणून 25000 रुपये.

299 आणि 399 रुपयांच्या पॉलिसीत काय फरक?
पोस्ट ऑफिसअंतर्गत 299 व 399 रुपयांच्या अपघात विमा योजनेत एकच फरक आहे. बाकी सर्वसारखेच आहे. 399 च्या योजनेत विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना 1 लाखापर्यंतची मदतही शिक्षणासाठी मिळू शकते, तर ही मदत 299 च्या अपघात विमा योजनेत मिळणार नाही. त्याच प्रमाणे 399 योजनेत अंत्यसंस्कार खर्च, वाहतूक खर्च, शिक्षण खर्च देण्यात येतो. हा खर्च 299 योजनेत मिळत नाही.

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व टपाल कार्यालयातून गेल्या सहा महिन्यांत सुमारे 35 हजार जणांनी या विम्याचा लाभ घेतला आहे. ही योजना खूप फायद्याची असून कमी पैशात मोठा परतावा यात जर अपघात घडल्यास मिळतो.

                                                          – नितीन बने,
                                        जनसंपर्क डाक निरीक्षक, पिंपरी मुख्यालय

Back to top button