पिंपरी : गुढीपाडव्याच्या साहित्याने बाजारपेठ फुलली | पुढारी

पिंपरी : गुढीपाडव्याच्या साहित्याने बाजारपेठ फुलली

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात येते. त्यानिमित्त गुढीसाठी लागणार्‍या साहित्याने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. सध्या बाजारात रेडिमेड गुढी मिळत असली तरी बहुतांश नागरिक पारंपरिक पद्धतीने गुढी उभी करतात. त्यासाठी लागणार्‍या बांबूची नागरिक खरेदी करत आहेत. तर दुसरीकडे नावीन्यपूर्ण रंगीबेरंगी रेडिमेड गुढी खरेदीसाठी नागरिकांची पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

गुढीसाठी लागणार्‍या नवीन वस्त्र, तांब्या, फुलांचा हार, पाने, माळा आणि साखरगाठींची खरेदी सुरू झाली आहे. गुढीवर साखरगाठीचा हार घालण्यात येत असल्याने त्यांना अधिक महत्त्व असते. साखरगाठींच्या माळांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. तसेच भारतीय सण म्हटले की, पारपंरिक वेशभूषा आणि दागिने आलेच. यासाठी महिला सज्ज झाल्या आहेत.

दुकानात रेडिमेड नऊवारी साडी आणि पारपंरिक दागिने खरेदीकडे महिलांचा कल दिसून येतो. तर पुरुष झब्बा कुर्ता किंवा जिन्सवर कुर्ता ही फॅशन करतात. त्यामुळे पांढर्‍या व केशरी रंगातील कुर्ते बाजारात उपलब्ध झाले आहेत. याबरोबरच रंगीत फेटेदेखील भाड्याने मिळतात. गुढीपाडव्यानिमित्त काढल्या जाणार्‍या शोभायात्रांसाठी लागणार्‍या या गोष्टींची सध्या खरेदी जोरात सुरू आहे.

Back to top button