पिंपरीत इन्फ्लुएंझाचा एकही रुग्ण नाही; नागरिकांनी काळजी घ्यावी | पुढारी

पिंपरीत इन्फ्लुएंझाचा एकही रुग्ण नाही; नागरिकांनी काळजी घ्यावी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : इन्फ्लुएंझा एच 3 एन 2 या विषाणूची रुग्णसंख्या राज्यामध्ये वाढण्यास सुरुवात झाली आहे; मात्र असे असताना पिंपरी-चिंचवड शहरामध्ये या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जानेवारी महिन्यापासून शहरामध्ये या विषाणूचे सात रुग्ण आढळले होते. सद्यस्थितीत शहरामध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही, असे महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सोमवारी (दि.20) सांगितले.

शहरामध्ये एच 3 एन 2 या विषाणूचे 7 रुग्ण आढळले होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र, या रुग्णाला इतर गंभीर आजार होते. तर, इतर सहा रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर गेल्या तीन दिवसांमध्ये शहरामध्ये एकही नवीन रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरामध्ये एच 3 एन 2 या विषाणूचा एकही सक्रिय रुग्ण नाही.

या विषाणूची लागण झाल्यानंतर सर्दी व खोकला मोठ्या प्रमाणावर होतो. घसादुखी होते. तीव्र स्वरुपाचा ताप येतो.
रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या नागरिकांना या विषाणूची लागण तत्काळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच मधुमेह, हृदयरोग यासारखे दुर्धर आजार असणार्‍या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. तसेच, कोरोनाबाधित सुमारे 30 रुग्ण असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. 2 ते 3 रुग्ण रुग्णालयात दाखल असून, उर्वरित रुग्ण घरीच उपचार घेत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

घाबरून जाऊ नये
सद्यस्थितीत शहरामध्ये एच 3 एन 2 चा एकही रुग्ण नाही. आतापर्यंत आढळलेले सात रुग्ण हे जानेवारी महिन्यापासूनचे होते. ज्या एका रुग्णाचा मृत्यू झाला, त्याला इतर दुर्धर आजार होते. तसेच त्यांच्या मृत्यूचे कारण हे या विषाणूचे नव्हते. तर आता एकही रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे तसेच घाबरून जाऊ नये, असे आवाहन सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

पालिकेची रुग्णालये सज्ज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, पिंपरी कॅम्पातील नवीन जिजामाता रुग्णालय, आकुर्डीतील हभप प्रभाकर कुटे रुग्णालय आणि संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात इन्फ्लुएंझा विषाणू रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. त्या प्रत्येक रुग्णालयात 10 बेडचे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. मात्र, सध्या तेथे एकही रुग्ण दाखल नाही.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
सर्दी, खोकला, घसादुखी, ताप लक्षणे असल्यास त्वरित नजीकच्या महापालिकेच्या दवाखान किंवा रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्या. या आजारावर औषधोपचार पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी केले आहे.

Back to top button