खडकी; पुढारी वृत्तसेवा : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत पोलिस स्टेशनजवळील रेल्वे बोगद्यात पाणी साचत असल्याने रस्ता निसरडा झाला असून, अनेक चेंबरही तुटले आहेत. या ठिकाणी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन दुरुस्ती करणार का? तसेच बोगद्यातून प्रवास करायचा करा, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विशाल ओव्हाळ, माहिती अधिकार कार्यकर्ते राजेश मोरे व नागरिकांनी उपस्थित केला आहे.
खडकी पोलिस स्टेशनजवळील रेल्वे बोगद्यातील अनेक चेंबर तुटले आहेत. या ठिकाणी नाल्याचे पाणी साचत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी निसरडा झाला असून, त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे दुचाकी घसरून काही जण जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. बोगद्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने कसरत करावी लागत आहे.
प्रशासनाने बोगद्यात पाणी साचू नये, यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र, तरी देखील ही समस्या सुटली नाही. निसरडा रस्ता, तुटलेले चेंबर आणि रस्त्यावरील शेवाळामुळे हा रस्ता वाहतुकीस अडथळा येत असून, बोर्ड प्रशासनाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. या बोगद्यातील चेंबरची दुरुस्ती करून पाणी साचू नये, यासाठी उपायययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
रेल्वे बोगद्याखाली लहान सुमारे 300 ते 400 मीटर लांबीचा नाला आहे. नाल्याची साफसफाई न झाल्यास पाणी बोगद्यात साचत आहे. पाण्यामुळे अनेक चेंबर तुटले आहेत.
– ए. ई. संत, मुख्य अभियंता