राज्यात 22 मार्चपर्यंत गार वारे, त्यानंतर पारा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज | पुढारी

राज्यात 22 मार्चपर्यंत गार वारे, त्यानंतर पारा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

पुणे : उत्तर भारतात सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील कमाल तापमानात 3 ते 4.5 अंशांनी घट झाली असून, अजून दोन ते तीन दिवस गार वार्‍याचा प्रभाव राहील. त्यानंतर मात्र राज्यात उन्हाचा कडाका जाणवेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. जम्मू-कश्मीरपासून ते मध्य प्रदेशपर्यंत पाऊस सुरू आहे. मात्र, गुजरात, महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील काही भागांतून पाऊस कमी झाला आहे. महाराष्ट्रात फक्त विदर्भात 22 मार्चपर्यंत पाऊस आहे. हा पाऊस लांबला, तर 25 मार्चपर्यंत विदर्भात तुरळक होऊ शकेल. राज्यात सध्या गार वारे अन् कमाल तापमानात जी घसरण झाली आहे त्याचे कारण उत्तर भारतातील पाऊस हे आहे. त्या भागात अजूनही पावसाचा प्रभाव कमी झालेला नाही त्यामुळे त्या भागातील गार वारे सध्या महाराष्ट्रात येत असल्याने हा फरक जाणवत आहे.

महाबळेश्वर सर्वांत थंड..
राज्यातील कमाल व किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट झाली असून ,सोमवारी विदर्भातील ब्रह्मपुरी येथील कमाल तापमान 34 अंश, तर महाबळेश्वरचे किमान तापमान सर्वांत कमी 13.2 अंशांवर खाली आले होते. फेब्रुवारी व मार्चच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमान 38 ते 40 अंशांवर गेले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत यात कमालीची घट झाली आहे. 25 मार्चनंतर पुन्हा कमाल तापमानात वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Back to top button