पिंपरी : गुढीपाडव्यानंतरच मिळणार ‘आनंदाचा शिधा’ | पुढारी

पिंपरी : गुढीपाडव्यानंतरच मिळणार ‘आनंदाचा शिधा’

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांना गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे. गुढीपाडवा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, हा शिधा गुढीपाडवा झाल्यानंतरच येणार आहे. धान्य दुकानांमध्ये धान्य पोहचण्यास आठवडाभराचा कालावधी लागणार आहे.

राज्य सरकारने गुढीपाडवा या मराठी नववर्षापासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारकांसाठी 100 रुपयांत ’आनंदाचा शिधा’ देण्याचे जाहीर केले होते. ई-पॉस प्रणालीद्वारे देण्यात येणार्या या ’आनंदाचा शिधा’मध्ये रवा, चणाडाळ, साखर प्रत्येकी एक किलो आणि 1 लिटर पामतेल दिले जाणार आहे.

गतवर्षी दिवाळीच्या कालावधीत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आला होता. दरम्यान, हा शिधा आता कधी मिळणार, याची विचारणा शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्य दुकानांमध्ये करु लागले आहेत. महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकिपर्स असोसिएशनचे खजिनदार विजय गुप्ता म्हणाले, स्वस्त धान्य दुकानांमध्ये अद्याप आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी आवश्यक धान्य आलेले नाही. हे धान्य आल्यानंतर लाभार्थी नागरिकांना त्याचे वाटप करण्यात येईल.

‘आनंदाचा शिधा’ हा गुढीपाडवा (22 मार्च) ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल) या कालावधीत वितरित करायचा आहे. अद्याप त्यासाठी धान्य आले नसले तरी पुढच्या आठवड्यात धान्य आल्यानंतर लाभार्थ्यांना त्याचे वाटप सुरु होईल.

          – दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय, निगडी.

Back to top button