पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे यार्डचे काही दिवसात नुतणीकरणाचे काम सुरू होणार असल्याने पुणे ते मुंबई मार्गे धावणार्या गाड्यांना चिंचवड स्थानकात थांबा देण्याची मागणी पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यार्ड नूतनीकरणाचे काम पूर्ण होण्याकरिता सुमारे एक वर्षाचा किंवा त्याहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणुन रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवड चे अध्यक्ष ईक्बाल मुलानी व डी. आर. यू. सी. सी. सदस्य बशीर सुतार यांनी रेल्वे विभागाला पत्रव्यवहार केला.
त्यानुसार या कालावधीत पुणे स्थानकावरील प्रवांशाचा भार कमी करण्यासाठी मुंबईवरून येणा-या व जाणा-या सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांना यार्डाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत चिंचवड या मध्यवर्ती स्थानकात थांबा देण्याची मागणी केली. एप्रिल महिन्यापासुन सुट्टीचा कालावधी सुरू होत असून,साधारणपणे जुलै पर्यत मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. याचा मोठ्या प्रमाणावर पुणे स्थानकावर भार पडतो.म्हणून हि मागणी करत असल्याचे मत मुलाणी यांनी नोंदविले.