पुणे : ‘महाविकास’च्या नेत्यांनी आघाडीविना लढावे : शिवसेनेचे उपनेते विजय शिवतारे | पुढारी

पुणे : ‘महाविकास’च्या नेत्यांनी आघाडीविना लढावे : शिवसेनेचे उपनेते विजय शिवतारे

माळेगाव : पुढारी वृत्तसेवा : ‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवाल्यांनो हिंमत असेल तर आघाडीशिवाय स्वतंत्र निवडणूक लढून दाखवा, त्या वेळेला तुम्हाला खरे चित्र कळेल आपण किती पाण्यात आहोत? उध्दव ठाकरे, शरद पवार, अजित पवार या वैयक्तिक स्वार्थासाठी महाविकास आघाडी करणार्‍या पक्षनेत्यांना आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा दिसेल,’ अशा शब्दांत माजी राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते विजय शिवतरे यांनी महाविकास आघाडींच्या नेतेमंडळींना आव्हान दिले आहे. शारदानगर (ता. बारामती) येथे पत्रकारांच्या कट्ट्यांवर शनिवारी (दि. 18) विजय शिवतारे यांनी गावभेट दौर्‍यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. बारामतीच्या लोकप्रतिनिधींनी लोकसभा मतदारसंघात कामे करताना इतर तालुक्यांवर अन्याय करून बारामतीमध्ये कामे केली आहेत असा आरोप करून शिवतारे पुढे म्हणाले, देशातील मोठ्या नेत्यांना आणून बारामती विकासाचे ’मॉडेल’ दाखवणार्‍या शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना अद्याप जिरायत भागातील 39 गावांच्या पाणीटंचाई चा प्रश्न सोडवता आला नाही, तर बारामतीचे वैभव हे फक्त पूर्व -पश्चिम भागापुरते मर्यादित असल्याचे सांगून शिवतारे म्हणाले, बारामतीमध्ये जिरायती भागाचा पाण्याचा प्रश्न पन्नास वर्षे सुटला नाही, तो प्रश्न मी शिवसेना-भाजप सरकारच्या माध्यमातून सोडविणार आहे.

बारामतीमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी नवीन पिढी उत्सुक असून, प्रस्थापितांच्या विरोधात काम करणार्‍या नवीन पिढीला संधी देण्याची आमची भूमिका आहे. त्यासाठी युवकांना एकत्रित करून शिवसेना वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. बारामतीच्या दौर्‍यावर मी त्यासाठीच आलो आहे. भाजप-शिवसेना हे पक्ष सर्वसामान्य शेतकरी व गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करत आहेत. आतापर्यंत अनेक लोकहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतले असल्याचा दावा शिवतारे यांनी केला. या वेळी आरोग्याविषयी नवीन योजना गरजूंपर्यंत पोचविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभा करावी, अशी मागणी रुग्णमित्र अविनाश गोफणे यांनी या वेळी केली.

निरा नदी प्रदूषण प्रश्न मुख्यमंत्र्यांना सांगणार

शेतकरी अविनाश देवकाते यांनी उपस्थित केलेल्या निरा नदीमधील प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्यास सांगणार असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. बारामतीत लढणार आणि जिंकणार बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीकरिता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर तुमचे नाव पुढे आले तर आपण लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न केला असता शिवतारे म्हणाले, ‘लढणार पण आणि जिंकणार असल्याचा विश्वासही आहे.’

Back to top button