

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : दिवसभर गर्मी आणि रात्री थंडी असे वातावरण गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी चिंचवडकरांना अनुभवायला मिळत आहे. दिवसा साधारण 30 अंश सेल्सिअस आणि रात्री 17 अंश सेल्सिअस तापमान असते. त्यामुळे हिवाळा आणि उन्हाळा अशी दोन ऋतूंची अनुभूती नागरिकांनी अनुभवली.
साथीच्या आजारांचे रूग्ण वाढण्याची शक्यता
अक्षरक्षः थंडी घालविण्यासाठी शहरात काही ठिकाणी शेकोट्या पेटवल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. मात्र, अशा वातावरणाती बदलामुळे सर्दी, पडसे, ताप आणि घशाच्या आजारात वाढ झाली असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. या बदलांमुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. ताप, सर्दी, खोकला असे अनेक साथीचे आजार बळावतात. अंगदुखी, उत्साह नसल्यासारखे वाटणे, डोके दुखणे असे अनेक आजार उद्भवतात. अचानक वाढलेला उष्मा आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे.
काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन
हिवाळ्यात हवा कोरडी असल्यामुळे हवेत धूळ अधिक प्रमाणात असते. या धुळीमुळे श्वसनाचे वेगवेगळे आजार निर्माण होतात. यात मुख्यत: दम्याच्या रुग्णांची संख्या अधिक असते. त्यामुळे उष्ण वातावरणातून थंड वातावरणात संक्रमण होणाच्या काळात दम्याच्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
थंड हवेशी संपर्क आल्यामुळे, अतिशय थंड पाणी प्यायल्यामुळे किंवा सकाळी बागेत फिरल्याने, थंड पाण्याने आंघोळ केल्यानेही दम्याचा झटका येऊ शकतो. दम्याच्या रुग्णांनी हिवाळ्यात सर्दीसारखे आजार होऊ नयेत, यासाठीही काळजी घ्यायली हवी, असे आवाहनही वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.