पिंपरी : शासकीय कार्यालयांकडे 21 कोटींची थकबाकी | पुढारी

पिंपरी : शासकीय कार्यालयांकडे 21 कोटींची थकबाकी

पिंपरी : शहरातील निवासी व बिगर निवासी खासगी मिळकतींसह शासकीय व निम्न शासकीय विभाग, संस्था व कार्यालयांकडेही मिळकतकरांची मोठी थकबाकी आहे. तब्बल 21 कोटी 34 लाखांची थकबाकी त्या कार्यालयांकडे आहे. थकबाकीदार नागरिकांवर ज्याप्रमाणे जप्तीची कारवाई केली जाते, त्याप्रमाणे महापालिका प्रशासन त्या कार्यालयांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरात सुमारे 6 लाख मिळकतींची नोंद महापालिकेकडे आहेत. त्यात निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र अशा मिळकतींचा समावेश आहे. पालिकेने सन 2023-24 आर्थिक वर्षात मिळकतकर दरात वाढ न करता नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध घेऊन 100 टक्के वसुलीवर भर देण्याचा निर्धार केला आहे. चालू सन 2022-23 या आर्थिक वर्षात 31 मार्चपर्यंत एकूण 1 हजार कोटींचे वसुलीचे टार्गेट कर संकलन विभागासमोर आहे.

700 कोटींची वसुली
कर संकलन विभागाने शनिवारपर्यंत (दि. 18) 700 कोटींची वसुली केली आहे. पुढील 12 दिवसांत त्या विभागास 300 कोटींची वसुली करायची आहे. त्यासाठी कर संकलन विभागाने कंबर कसली आहे. दुसरीकडे निवासी व बिगरनिवासी मिळकतींसह शासकीय विभाग, संस्था व कार्यालयाच्या मिळकतींवर मोठी थकबाकी असल्याचे चित्र आहे. शहरात एकूण 94 शासकीय कार्यालये आहेत. त्यापैकी तब्बल 46 कार्यालयांकडे मिळकतकर थकीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या विभाग, संस्था व कार्यालयांनी कर भरलेला नाही. त्याच्याकडे आतापर्यंतचा तब्बल 21 कोटी 34 लाख 17 हजार 647 इतकी मिळकतकर थकीत आहे.

औंध रुग्णालयाकडे 5 लाख 40 हजार रुपये थकीत कर
नवी सांगवी येथील औंध उरो रुग्णालयाकडे 5 लाख 40 हजार 951 इतकी थकबाकी आहे. तेथे पिंपरी-चिंचवड, पुणे व जिल्ह्यातील रूग्ण उपचार घेतात. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या किवळे येथील कार्यालयाकडे 26 लाख 61 हजार 528 इतका थकीत कर आहे. ही थकीत कर वसुली करण्याचे आव्हान कर संकलन विभागासमोर आहे.

नियमानुसार ‘त्या’ थकबाकीदारांवरही कारवाई
शहरातील निवासी व बिगरनिवासी थकबाकीदार मिळकतधारकांवर जप्तीची कारवाई मोहीम केली जात आहे. थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकबाकी असलेल्या शहरातील शासकीय कार्यालयांना नोटीसा देऊन मिळकतकर वसूल केला जाईल, असे करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

एमआयडीसीकडे सर्वांधिक 10 कोटींची थकबाकी
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) बिजलीनगर, चिंचवड येथील कार्यालयाकडे 4 कोटी 83 लाख 1 हजारांची मोठी थकबाकी आहे. तसेच, एमआयडीसीच्या शहरात विविध ठिकाणी मोकळा जागा आहेत. त्याचा तब्बल 4 कोटी 88 लाख 38 हजार इतका मिळकत कर थकला आहे. महापालिकेकडून वारंवार नोटीसा देऊनही एमआयडीसीकडून थकीत कर भरला जात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

Back to top button