

महेंद्र कांबळे :
पुणे : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातही आता पती-पत्नीच्या नात्यातील वितुष्ट सार्वजनिक झाले आहे. पत्नीपीडितांनी पत्नीविरोधात तक्रारी नोंदविल्या आहेत. चार वर्षांत सुमारे तीन हजार पुरुषांनी 'भरोसा सेल'कडे तक्रार नोंदवली आहे. पत्नी माझे ऐकतच नाही, पालकांचा मान ठेवत नाही, माहेरच्यांचे ऐकते, विवाहबाह्य संबंध, पत्नी सतत सोशल मीडियावर व्यग्र असल्याने वाद विकोपाला गेल्याची उदाहरणे 'भरोसा सेल'कडे आलेल्या तक्रारींवरून समोर आली आहेत.
पुरुषच महिलांचा छळ करतात, असा पूर्वापार समज असताना महिलांकडूनही पुरुषांचा छळ होत असल्याचे या तक्रारींवरून दिसून आले आहे. दोघेही कमावते असल्यामुळे माघार कोणी घ्यायची, यातून वाद वाढत जातात. पुरुषांचा अहंकारही भांडणे वाढविण्यास कारणीभूत ठरतो. पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर पत्नीचे घरातील महत्त्व पटू लागते. अखेरीस पोलिसांच्या महिला साह्यता कक्षाकडे धाव घेऊन तिला नांदण्यास तयार करावे म्हणून पती अर्ज करतो.
चुकीचे आरोप करून पुरुषांना दिला जातो त्रास
काही महिला किरकोळ कारणावरून वाद झाला तरी पतीवर दादागिरी करतात. महिलांचे हट्ट न पुरविल्यावरून, त्यांचे म्हणणे न ऐकल्यास, एखाद्या गोष्टीला विरोध केल्यास, मुलांकडे लक्ष द्यायला सांगितल्यानंतर भांडण होते. रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहण्यास अथवा मोबाईलवर कमी वेळ घालविण्यास सांगितल्यावर वाद होतात. अशा वेळी पोलिसांकडे तक्रार करून जेलची हवा खायला लावण्याची धमकी महिला पुरुषांना देतात. कधी कोर्टात जाण्याची धमकी दिली जाते. याशिवाय सासरच्या व्यक्तींना बोलावून दमबाजी केली जाते. कधी-कधी मानलेला भाऊ, जवळचा मित्र यांच्याकडून पतीवर दबाव आणला जातो.
वादाचे कारण वेगळेच असते; पण पुरुषांवर कौटुंबिक कलहात विनाकारण चुकीचे आरोप करून त्यांना त्रास दिला जातो. त्यानंतर असेच पीडित पती 'भरोसा सेल'कडे धाव घेत आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे आणि 'भरोसा सेल'मधील अधिकारी व कर्मचारी समुपदेशन करीत आहेत.
राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करावा यासाठी याचिका
सर्वोच्च न्यायालयाकडे 'राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करावा' अशी मागणी करणारी याचिका नुकतीच दाखल झाली आहे. यामध्ये विवाहित पुरुषांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचे नमूद केले आहे. 2021 मध्ये देशभरात 1,64,033 जणांनी आत्महत्या केल्या असून, त्यात विवाहित पुरुषांची संख्या 81,063 तर विवाहित महिलांची संख्या 28,680 होती. 2021 मध्ये कौटुंबिक समस्यांच्या कारणामुळे 33.2 टक्के पुरुषांनी, तर अन्य कारणाने 4.8 टक्के पुरुषांनी आत्महत्या केल्याचे राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालाचा हवाला याचिकेत देण्यात आला आहे.
'भरोसा सेल'कडे आलेल्या तक्रारी
2019
603
2020
477
2021
708
2022
864
2023
85
(जानेवारीअखेर)