तळेगाव दाभाडे : अवकाळीमुळे ऊसतोड कामगारांना सक्तीची विश्रांती | पुढारी

तळेगाव दाभाडे : अवकाळीमुळे ऊसतोड कामगारांना सक्तीची विश्रांती

तळेगाव दाभाडे : अवकाळी पावसामुळे मावळ व मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची ऊसतोड थांबल्याने कामगारांना सक्तीने विश्रांती घ्यावी लागत आहे. त्यामुळे कामगार उसाच्या शेतातील पाणी कमी होण्याची वाट पाहत आहेत. श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा सध्या 25 वा गाळप हंगाम सुरू आहे.

अखेरच्या टप्प्यातील ऊस तोडणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने मावळ आणि मुळशी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात जोरदार हजेरी लावली आहे. पावसाने उसाच्या शेतात पाणी साठल्याने ऊसतोड बंद पडली आहे. तर, ऊसतोडणी नंतरची वाहतूकही पूर्णपणे कोलमडली आहे.

रोजच्या गाळपासाठी 3500 मॅट्रिक टन उसाची गरज
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे रोजच्या गाळपासाठी साधारणपणे 3 हजार 500 मॅट्रिक टन उसाची गरज लागते. कारखान्याने ऊसतोडीचे नियोजन मावळ, मुळशी, खेड, हवेली तसेच शिरूर या तालुक्यामध्ये केलेले असून, या सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडला होता. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

4 लाख 65 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप
या हंगामाचा सध्या 144 वा गाळप दिवस सुरू असून, आतापर्यंत 4 लाख 65 हजार मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. तर, 5 लाख 26 लाख 600 टन साखरीचे उत्पादन झाले आहे. सलग 25 वर्षे कारखाना सलगपणे गाळप करीत आहे.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले व उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे रौप्य महोत्सवी गाळप हंगाम सुरू असताना अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने शेतकरी चिंताग्रत झाले आहेत. यावर्षी अतिवृष्टी तसेच अवकाळी पावसामुळे ऊसशेतीचे मोठे नुकसान होऊनही शेतकरी आणि कारखान्याचे प्रशासन यांच्या प्रयत्नांमुळे गाळप हंगाम सुरू आहे. कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वी होत आहे.

 – साहेबराव पाठारे, कार्यकारी संचालक, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना

Back to top button