पुणे : मोरगाव शासकीय विश्रामगृहाचे काम प्रगतीपथावर

मोरगाव : पुढारी वृत्तसेवा : मोरगाव येथे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे शासकीय विश्रामगृहाच्या अत्याधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. काम प्रगतीपथावर असून, 30 जूनपर्यंत ते पूर्ण होणार आहे. कामासाठी एक कोटी 17 लक्ष रुपये खर्च येणार असल्याची माहिती बारामती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता खालीद शेख यांनी दिली. स्थापत्यशास्त्रज्ञ श्याम हिंगसे, उपअभियंता रामसेवक मुकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विश्रामगृहाचे काम होत आहे.
अष्टविनायकांतील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मोरगाव येथे लाखो भाविक संकष्टी, दसरा इत्यादी सणांदिवशी नेहमी येत असतात. आमदार, खासदार, मंत्री, न्यायाधीश, विविध सरकारी अधिकारी, कर्मचारी व राज्यासह व राज्याबाहेरील भाविक तसेच परदेशी नागरिकही श्री मयूरेश्वराच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या व्यवस्थेसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नाने मोरगाव येथे 2007 मध्ये शासकीय विश्रामगृह बांधले होते. त्यावेळी एक व्हीआयपी व दोन साधे सूट व अल्प प्रमाणात लागणा-या बाबी उपलब्ध होत्या.
एक व्हीव्हीआयपी, दोन व्हीआयपी सूट
अत्याधुनिक होत असलेल्या विश्रामगृहात अत्याधुनिक सुविधायुक्त तीन सूट (त्यातील एक व्हीव्हीआयपी, दोन व्हीआयपी सूट) , किचन हॉल, वेटिंग रूम, डायनिंग रूम, फर्निचर, वॉल प्लेटिंग, वॉशरूम फिटिंग्स आदींबाबत उत्तम सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. नवीन सुविधांमुळे विश्रामगृहाचा उपयोग आमदार, खासदार, मंत्री, मान्यवरांना अधिक सुखावह होणार आहे. मोरगाव येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी कांतीलाल चांदगुडे व सहकारीही या कामावर परिश्रम व देखरेख करीत आहेत.