पुणे : बेशिस्त ऊस वाहतुकीवर कारवाईची मागणी | पुढारी

पुणे : बेशिस्त ऊस वाहतुकीवर कारवाईची मागणी

मोरगाव : पुढारी वृत्तसेवा :  यंदाचा ऊस गाळप हंगाम संपत आला आहे. अजूनही कारखान्यात ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर रस्त्यांवरून ठिकठिकाणी दिसून येत आहेत. मात्र, वाहतूक नियमांचे पालन न करता ही वाहतूक सुरू असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. अनेकदा ओव्हरलोडमुळे ट्रॅक्टर नादुरुस्त होत असून, रस्त्याच्या मध्यभागी बंद पडत असल्याने रहदारीलाही अडथळा ठरत आहेत. या धोकादायक वाहतुकीकडे आरटीओ प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातून सोमेश्वर व माळेगाव सहकारी साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक सुरू आहे. मात्र, ही ऊस वाहतूक धोकादायकरीत्या सुरू असून, वाहतूकदारांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली सुरू आहे. परिणामी, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटना वाढल्या आहेत.

एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून ऊस वाहतूक केली जात आहे. अनेकदा चालक रस्त्याच्या मध्यभागातून ट्रॅक्टर भरधाव पळविताना दिसतात. त्यामुळे दुसर्‍या वाहनचालकांना जाण्यासाठी रस्ता राहत नाही. चढाला लागल्यानंतर हे ट्रॅक्टर अधिक धोकादायक ठरत आहेत. ओव्हरलोडमुळे गती मंदावत असल्याने नागमोडी वळणाने चालक चढ चढत आहेत.

काही जण क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहत आहेत. वाहन चालविताना मोठ्या आवाजात ध्वनिवर्धकाचा किंवा हेडफोनचा वापर केला जात आहे. वाहनांवर नंबरप्लेट, रिफ्लेक्टर, इंडिकेटर किंवा दिवे चालू नसतात. काही चालक मद्य प्राशन करून किंवा विनापरवाना वाहन चालवितात. यामुळे इतर वाहनचालकांसाठी अपघात होत आहेत.याकडे आरटीओ विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. आरटीओकडून ऊस वाहतुकीबाबतची नियमावली कारखान्यांना दिलेली असूनही वाहतूकदार नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. आरटीओ विभागाने याबाबतची दखल घेत संबंधित वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

Back to top button