वाल्हे : आनंदाचा शिधा मिळणे कठीण ; कर्मचारी संपात सामील असल्याने शिधा वाटपाबाबत संभ्रम | पुढारी

वाल्हे : आनंदाचा शिधा मिळणे कठीण ; कर्मचारी संपात सामील असल्याने शिधा वाटपाबाबत संभ्रम

समीर भुजबळ : 

वाल्हे : राज्य शासनाकडून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गोरगरिबांना “आनंदाचा शिधा” मिळणार की नाही? यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारी कर्मचार्‍यांच्या संपामुळे गुढीपाडवा तोंडावर आला, तरी अद्याप आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहचलेला नाही. गुढीपाडवा दि. 22 रोजी आहे. परंतु, कर्मचार्‍यांचा संप अद्याप मिटलेला नाही. यामुळे चार दिवसांत ट्रकमध्ये माल भरणार कधी? तो प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातील रेशनिंग दुकानांवर पोहचणार कधी? आणि वाटपाला सुरुवात होणार कधी? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

राज्य मंत्रिमंडळाने गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. केशरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. दारिर्द्यरेषेवरील केशरी शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चनाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल मिळणार आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दिवाळीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात आला होता. त्याच धर्तीवर सामान्य जनतेचा पाडवा गोड करण्यासाठी सरकारने 100 रुपयांत वरील चार वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सामान्य जनतेत आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु, सरकारी कर्मचार्‍यांच्या संपामुळे त्यांच्या पदरी निराशा येण्याची चिन्हे आहेत. पुरवठा विभागाचे कर्मचारी संपात सामील असल्याने शिधा वाटपाबाबत माहिती मिळणे कठीण झाले आहे.

पुरंदरला 37 हजार 244 लाभार्थी
पुरंदर तालुक्यात अंत्योदय योजनेंतर्गत 5 हजार 248, प्राधान्य योजनेत 31 हजार 996 लाभार्थी आहेत. एकूण लाभार्थी 37 हजार 244 आहेत.

Back to top button