

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहराचा विकास होत असताना येथे प्रत्येकाला सुरक्षित वाटले पाहिजे. कोणत्याही कुटुंबाला, मुलींना सुरक्षित वाटले पाहिजे. टवाळखोर पोरांना सोडणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.
बारामती औद्योगिक वसाहतीच्या डॉ. अप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रणजित पवार, माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, सोमेश्वरचे संचालक संग्राम सोरटे, मनोज पोतेकर, अविनाश लगड, रोहिदास हिरवे आदी या वेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, बारामती परिसरात देशभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. एक लाख मुले, मुली येथे शिक्षण घेत आहेत. शहराची अर्थव्यवस्था बदलत आहे. लोकांचे राहणीमान बदलत आहे. बारामती शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. सत्ता गेल्यानंतर विकासाचा वेग मंदावेल, असं वाटत होतं. राजकीय मतांतरे असू शकतात. पण जेव्हा आम्ही सत्तेत असतो तेव्हा कामात राजकारण आणत नाही. त्यामुळे सत्ता नसताना कामे अडत नसल्याचे त्यांनी सांगितले.
बारामतीत लघुउद्योगांना चालना देण्यासाठी आणखी उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. बारामतीत स्पोर्ट्स हब करणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअमसमोर शॉपिंग कॉम्प्लेक्ससह प्रशस्त नाट्यगृह, उद्यान तसेच सर्व सुविधांयुक्त वाचनालय उभारण्यात येणार आहे. बारामती बाजार समिती, बारामती दूध संघ इमारतीसह आयुर्वेदिक कॉलेज इमारत आणि कर्हा नदी सुशोभीकरण करून शहराच्या वैभवात भर घालणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. प्रास्ताविक रणजित पवार यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.
रेल्वेच्या जागेचा प्रश्न मार्गी
खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केल्याने रेल्वेच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. सेवा रस्त्यासाठी ही जागा घेतली जाणार आहे. त्यासाठी पूर्वी सहा टक्के रकमेची मागणी होती. ती दीड टक्क्यांवर आली. त्यामुळे पंचायत समितीपर्यंतच्या सेवा रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.