पुणे : खेडच्या च-होलीत २७ मार्चपासून रंगणार महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत | पुढारी

पुणे : खेडच्या च-होलीत २७ मार्चपासून रंगणार महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत

राजगुरूनगर: पुढारी वृत्तसेवा : बैलगाडा शर्यत बंदी उठल्यानंतर प्रथमच खेड तालुक्यातील आळंदी नजीकच्या चऱ्होली येथे २७ ते ३१ मार्च अशा पाच दिवस ‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे’ आयोजन करण्यात आले आहे. खेड पंचायत समिती आणि बाजार समितीचे माजी सभापती रामदास ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त या शर्यती भरवण्यात आल्या आहेत. त्यासाठीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असुन दि २३ मार्चला सोळुता खेड येथे सकाळी आठ पासुन टोकन काढण्यात येणार आहे.बैलगाडा मालकांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन सभापती रामदास ठाकुर युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बैलगाड्यांसाठी भव्य स्वरूपात बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात फायनलमध्ये प्रथम येणाऱ्या बैलगाड्या साठी १ महिंद्रा थार, दुसऱ्या व तिसऱ्या साठी प्रत्येकी एक ट्रॅक्टर ,चौथ्या क्रमांकासाठी बुलेट, तसेच २० दुचाकी ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय प्रथम ,द्वितीय, तृतीय आणि चौथ्या क्रमांकासाठी २ लाख ,१ लाख ५१ हजार,१ लाख आणि ५१ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे नियोजन व बक्षिसांची भव्यता विचारात घेता राज्यातील नामांकित बैलगाडे या शर्यतीत सहभागी होणार असुन शौकिनांसाठी ही शर्यत पर्वणी ठरणार आहे.

मान्यवर राहणार उपस्थित
खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या शर्यतीच्या घाटात दि २७ रोजी माजी मंत्री धनंजय मुंडे, दि २८ रोजी नरहरी शिरवळ,दि २९ रोजी दिलीप वळसे पाटील, दि ३० रोजी जयंत पाटील आणि ३१ रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.तसेच पुणे जिल्ह्यातील माजी मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार बैलगाडा शर्यतीच्या घाटात शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

Back to top button