पुणे : गुढीपाडव्यानंतरच मिळणार आनंदाचा शिधा | पुढारी

पुणे : गुढीपाडव्यानंतरच मिळणार आनंदाचा शिधा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे. मात्र, अजूनही पुणे जिल्ह्यात किटमधील काही साहित्य आलेले नाही तसेच शासकीय कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने ‘आनंदाचा शिधा’ वितरणावर परिणाम होणार असून, पाडव्याला शिधा संच लाभार्थ्यांच्या घरात पोहचण्याची शक्यता कमी आहे. दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ योजना राबविण्यात आली होती.

मात्र, त्या वेळी नियोजनाच्या अभावामुळे अनेक भागांत दिवाळी संपल्यानंतर ‘आनंदाचा शिधा’ जनतेपर्यंत पोहचला होता. त्या वेळी झालेल्या चुका सुधारून आतातरी वेळेच्या आत शिधा संच लाभार्थ्यांना मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील पुरवठादार हा पूर्वीचाच नेमला आहे. आतापर्यंत बारा ट्रक धान्य प्राप्त झालेले आहे. मात्र,
त्यात काही साहित्य अजूनही प्राप्त झालेले नाही.

शंभर रुपयांत काय मिळणार..?
जिल्ह्यातील ग्रामीण भागात 5 लाख 61 हजार, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 3 लाख 17 हजार लाभार्थी आहेत. शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल मिळणार आहे.

Back to top button