मिळकत कर सवलतीचे श्रेय पुणेकरांचे : आमदार धंगेकर | पुढारी

मिळकत कर सवलतीचे श्रेय पुणेकरांचे : आमदार धंगेकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणेकरांना मिळकत करात 40 टक्के सवलत काँग्रेसच्या कार्यकाळात दिली होती. मात्र, फडणवीस सरकारने ही सवलत बंद केली. नागरिकांनी यावर आवाज उठवल्यानंतर पुन्हा ही सवलत लागू होणार आहे. याचे श्रेय भाजपचे नव्हे, तर पुणेकरांचे आहे, असे मत आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले. तसेच जुन्या वाड्याच्या पुनर्विकासाठी वेळ पडली तर न्यायालयात जाऊ, असेही ते म्हणाले. महापालिका परिसरात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत धंगेकर बोलत होते. या वेळी माजी आमदार मोहन जोशी, संजय बालगुडे उपस्थित होते.

धंगेकर म्हणाले, मिळकत करात देण्यात येणारी 40 टक्के सवलत पुन्हा लागू करण्यासाठी मी निवडून आल्याबरोबर महापालिका आयुक्तांची भेट घेतली. विरोधी पक्षांनी केलेल्या आंदोलनामुळे ही सवलत पुन्हा लागू होणार आहे. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही 500 स्क्वेअर फुटांच्या सर्व सदनिकांचा मिळकतकर माफ करायला हवा.

कसबा मतदारसंघातील जुन्या वाड्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासासाठी महामंडळ स्थापन केले पाहिजे. शनिवारवाड्याच्या 100 मीटर परिघातील बांधकामांसाठीच्या निर्बंधामुळे नागरिक त्रस्त आहेत. पुरातत्त्व खात्याच्या नियमावलीचा विषय हा केंद्र सरकारच्या कक्षेत असल्याने, केंद्राला सर्व कागदपत्रे सादर करू. तेथे हा प्रश्न सुटला नाही तर, न्यायालयात जाऊन वस्तुस्थिती मांडू, असेही धंगेकर म्हणाले.

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य शासनस्तरावर तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. भिडेवाडा येथील रहिवासी, भाडेकरू व दुकानदार यांनी स्मारक उभारणीसाठी सहकार्य करावे. यासाठी लवकरच सर्वांची भेट घेऊन प्रयत्न करणार असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.

Back to top button