पिंपरी : ‘एच 3 एन 2’ प्रतिबंधासाठी पालिकेकडून खबरदारी | पुढारी

पिंपरी : ‘एच 3 एन 2’ प्रतिबंधासाठी पालिकेकडून खबरदारी

पिंपरी : इन्फ्लुएन्झा ए – एच 3 एन 2 या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण शहरात आढळल्याने महापालिकेने आवश्यक दक्षता, तयारी व पुरेशी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी पालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांची उपलब्धता केली आहे. त्याचप्रमाणे, ऑक्सिजनची व्यवस्था केली आहे. या आजाराची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित डॉक्टरांकडून उपचार सुरू करावे. घाबरून जाऊ नये, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

शहरात एच 3 एन 2 चे काही बाधित रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे, भोसरीतील वृद्धाचा या आजाराने नुकताच मृत्यूदेखील झाला. या पार्श्वभूमीवर, पीसीएमसी स्मार्ट सारथी फेसबुक पेजवरून आयुक्त शेखर सिंह यांनी फेसबुक लाइव्हद्वारे नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना एच 3 एन 2 बाबत महापालिका करीत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

आयुक्त सिंह म्हणाले, मएच 3 एन 2 विषाणूचा संसर्ग सध्या देशभरात पसरत आहे. त्यामुळे काही प्रमाणात आपल्याकडे घबराट निर्माण झाली आहे. वायसीएममध्ये मृत्यू झालेल्या वृद्धाला फुफ्फुसाचा आजार होता. त्याशिवाय हृदयविकाराचाही त्रास होता. एच 3 एन 2 मुळे त्यांचा झालेला मृत्यू हे प्रासंगिक कारण असल्याचे रुग्णालयातील तज्ज्ञ समितीने स्पष्ट केले आहे. घसादुखी, ताप, खोकला, सर्दी असेल तर नजीकच्या रुग्णालयात दाखवून उपचार घ्यावे. आजार अंगावर काढू नये.

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये 10 खाटांचे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. जर, या आजाराचे रुग्ण वाढले तर एका रुग्णालयामध्ये या आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी औषधोपचाराबरोबरच घरी वाफ घेणे, गरम पाण्याच्या गुळण्या करणे, भरपूर पाणी पिणे आदी बाबींवर भर द्यायला हवा. या आजाराचे प्रसार होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, त्यामुळे घाबरून जाऊ नये, असे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button