पिंपरी : आता महिलांना माहेरची वाट आणखी सुकर! | पुढारी

पिंपरी : आता महिलांना माहेरची वाट आणखी सुकर!

राहुल हातोले

पिंपरी : राज्य शासनाने जाहीर केलेल्या महिला सन्मान योजनेस शहरातील एस.टी.च्या वल्लभनगर आगारास महिला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने महिलांसाठी माहेरची वाट आणखी सुकर झाली आहे. शासनाने महिला सन्मान योजनेअंतर्गत एस.टी.च्या तिकीट दरात पन्नास टक्के सवलत दिली आहे. तिकीट दरात सवलत दिल्याने महिलांचे माहेरचे अंतरही कमी होईल. पुढारी प्रतिनिधीच्या प्रत्यक्ष पाहणीनुसार एसटीमधील काही महिलांनी माहेरी जात असल्याची माहिती दिली.

महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात 50 टक्के सवलत शुक्रवार (दि. 17) रोजीपासून सुरू करण्यात आली. या सवलतीचा लाभ पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 100 हून अधिक महिलांनी घेतल्याची माहिती वल्लभनगर स्थानक प्रमुखांनी दिली.
महाराष्ट्र राज्याच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महिलांसाठी सन्मान योजना म्हणून सुरू करण्यात आली. या योजनेला शहरातील महिला प्रवाशांकडून दुसर्‍या दिवशीही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पुरावा देण्याची गरज नाही
एसटीच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड, मतदान कार्ड आदी पुरावा म्हणून वाहकाला दाखवावा लागतो. मात्र, महिलांना हाफ तिकिटासाठी कोणत्याच ओळखपत्राची मागणी करण्यात येत नाही.

सुरक्षित प्रवास
खासगी वाहनांपेक्षा एसटीचा प्रवास हा सुरक्षित असतो. महिलांसाठी तर आणखीनच सुरक्षिततेचा प्रवास आहे. तिकीट दरात पन्नास टक्के सवलत दिल्याने महिलावर्ग मोठ्या प्रमाणात एसटीने प्रवास करू शकेल.

माझ माहेर अहमदनगर आहे. मात्र, बसभाडे तसेच खासगी गाड्यांचे भाडे परवडण्यासारखे नसल्याने मी दोन-तीन महिन्यांतून एकदा जात होते; मात्र आता महिला सन्मान योजनेमुळे तिकीट दर 50 टक्के कमी झाला आहे. त्यामुळे आता माहेरी जाणे परवडत आहे. घरच्या मंडळींना शनिवार व रविवार सुटी असल्याने आता मी या दोन दिवशी माहेरी जाऊन येते.

                                                   -अश्विनी राजमाने, चिंचवड.

मी मुंबईला नोकरीला आहे. माझ्या पतीची नोकरी पुण्यामध्ये असल्याने मला दररोज पुणे-मुंबई प्रवास करावा लागतो. रेल्वेमध्ये जागा मिळत नसल्याने आम्ही खासगी वाहनांनी प्रवास करत होतो. मात्र, आता महिला सन्मान योजनेमुळे तिकीट दरात पन्नास टक्के सवलत मिळत आहे. परिणामी आता आम्ही महिला एसटीने प्रवास करीत आहोत.

                                                -नलिनी देशपांडे, निगडी.

महिला सन्मान योजनेच्या पहिल्याच दिवशी महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता तर महिलांचीच संख्या अधिक दिसून येत आहे. बर्‍याचदा जागेचा प्रश्न निर्माण होत आहे. महिलांसाठी एसटीचा प्रवास हा सुरक्षित आहे. त्यामुळे महिला वर्गाकडून एसटीच्या प्रवासाला अधिक प्राधान्य दिले जात आहे.

                           -पल्लवी पाटील, स्थानक प्रमुख, वल्लभनगर आगार.

पिंपरी ते तुळजापूर या बसमध्ये मी वाहक म्हणून काम करतो. कालपासून बसमध्ये एकूण प्रवाशांपैकी महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. ही सवलत एसटीसाठी अधिक फायदेशीर ठरू शकेल.
                                              -भारत नाईक, वाहक.

Back to top button