पुणे : जातवैधता प्रमाणपत्रासाठी मोहीम | पुढारी

पुणे : जातवैधता प्रमाणपत्रासाठी मोहीम

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, जेईई, नीट या परीक्षांद्वारे 2023-24 या पुढील शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या आणि जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज न केलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी तत्काळ जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जातवैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी), संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित जागेवर प्रवेश घ्यायचा असल्यास त्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिर्वाय आहे. त्यामुळे अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही अशा जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी https:// bartievalidity. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून त्याची एक प्रत आवश्यक कागदपत्रे, पुराव्यांची साक्षांकित प्रत जोडून येरवडा येथील जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.

यापूर्वी जातपडताळणी समितीकडे अर्ज सादर केलेल्या आणि प्रकरणात त्रुटी असलेल्या अर्जदारांना भ्रमणध्वनी, ई-मेलद्वारे संदेश देण्यात आले आहेत. त्या संदेशाप्रमाणे तातडीने त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे समितीचे अध्यक्ष आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी स्पष्ट केले.

Back to top button