पुणे : भाजपाच्या नवीन शहराध्यक्ष आठवडाभरात ; मोहोळ, शिरोळेंचे नाव आघाडीवर; बीडकर, घाटे यांची नावे चर्चेत | पुढारी

पुणे : भाजपाच्या नवीन शहराध्यक्ष आठवडाभरात ; मोहोळ, शिरोळेंचे नाव आघाडीवर; बीडकर, घाटे यांची नावे चर्चेत

ज्ञानेश्वर बिजले : 

पुणे :  भाजपच्या शहराध्यक्षपदी येत्या आठवड्यात नवीन चेहरा निवडला जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची नावे आघाडीवर आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीत ते अडकणार असल्याने माजी सभागृहनेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांच्या नावांचाही विचार होऊ शकतो, अशी चर्चा पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये आहे.

प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे सहा महिन्यांपूर्वी निवडल्यानंतर आता राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदी नवीन नियुक्ती करण्याच्या पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. या पदांवर तीन वर्षांसाठी नियुक्ती केली जाते. विधानसभा निवडणुकीनंतर पुण्याच्या शहराध्यक्षपदी जगदीश मुळीक यांची नियुक्ती झाली. त्यांची तीन वर्षे पूर्ण झाल्याने, नवीन शहराध्यक्ष निवडण्यात येणार असल्याचे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले. कसबा पेठ निवडणुकीच्या वेळी बावनकुळे यांनीही याबाबत संकेत दिले होते.

मुळीक यांच्या बदलासंदर्भात सहा महिन्यांपासून पक्षात चर्चा सुरू आहे. त्या वेळी मोहोळ यांच्या नावाला कोथरूड मतदारसंघाचा विचार करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तर बीडकर यांच्या नावाला खासदार गिरीश बापट विरोध करण्याची शक्यता प्रदेशातील वरिष्ठ नेत्यांनी गृहीत धरली. त्यामुळे, मध्यममार्ग म्हणून शिरोळे यांचे नाव शहराध्यक्ष पदासाठी पुढे आले होते. मात्र, महापालिका निवडणुकीपर्यंत शहराध्यक्षपदी राहू द्यावे, ही मुळीक यांची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याची चर्चा त्या वेळी स्थानिक नेत्यांमध्ये होती.

मुळीक यांचे पद त्या वेळी कायम राहिले, तर मोहोळ यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. राज्यातील महापालिका निवडणुकांची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर सोपविली. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार म्हणून बिडकर यांना उमेदवारी मिळणार आहे, तर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीत शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांचा समावेश असल्याची कुजबूज पक्ष कार्यकर्त्यांत सुरू आहे. खासदार बापट यांच्याजागी लोकसभेसाठी मोहोळ यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची सूत्रे द्यावीत, असा कार्यकर्त्यांच्या चर्चेचा एक प्रवाह आहे. मात्र, कसबा पेठ निवडणुकीचे प्रभारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती, याकडे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक लक्ष वेधतात.

भाजपचे शहरातील सहापैकी तीन आमदार पाच हजारांच्या आसपास मताधिक्यांनी विजयी झाले होते, तर कसबा पेठ हातातून निसटला आहे, त्यामुळे आमदारांना त्यांच्या मतदारसंघातच लक्ष केंद्रित करू द्यावे, त्यांच्यावर शहराची जबाबदारी देऊ नये, असे एका गटाचे म्हणणे आहे. तर आमदारांकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यास त्याचा फायदा होईल, असाही मुद्दा दुसर्‍या बाजूने मांडला जात आहे. बीडकर यांनी सभागृह नेते म्हणून केलेले काम लक्षात घेत महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचे नाव पुढे आले आहे. तर, शहर संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक वर्षे काम केलेले घाटे यांच्याबाबतही विचार सुरू आहे. ब्राह्मण समाजाला डावलल्याची चर्चा कसबा पेठ निवडणुकीच्या वेळी जोरात सुरू होती.

तोही मुद्दा विचारात घेण्याची शक्यता त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत. ब्राह्मण समाजाचा चेहरा, सध्या भाजपच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या उपाध्यक्षा माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचे नावही धक्कातंत्राच्या पद्धतीने पुढे येऊ शकते. राजेश पांडे यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. विकास मठकरी, योगेश गोगावले यांच्या काळात पक्षाचे संघटन वाढले, त्याच पद्धतीने रचना करण्यासाठी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने माजी खासदार प्रदीप रावत यांचे नावही सुचविले असल्याची चर्चा आहे.

कसबा पेठेच्या निकालाने नेतृत्व सावध !
कसबा पेठ निवडणुकीतील पराभवाने पक्षाचे नेतृत्व हादरले. मोठी ताकद लावूनही हार पत्करावी लागल्याने त्यांनी पुण्याबाबत सावध पवित्रा घेतला. नवीन शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुका होतील. महापालिकेत पुन्हा सत्ता येणार, या दाव्याला कसबा पेठेतील निकालाने खीळ बसली. तर, विधानसभेलाही काठावरील मताधिक्याने जिंकलेल्या मतदारसंघांत महाविकास आघाडीचे जोरदार आव्हान उभे राहू शकते. ते लक्षात घेत पक्षनेतृत्वाला नव्या पदाधिकार्‍यांची निवड करावी लागणार आहे.

Back to top button