पुणे : राज्यात नव्याने सव्वालाख हेक्टरहून अधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली | पुढारी

पुणे : राज्यात नव्याने सव्वालाख हेक्टरहून अधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून आणि केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून चालू वर्ष 2022-23 मध्ये सूक्ष्म सिंचनासाठी 666 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत 345 कोटी रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. तर राज्यात 1 लाख 28 हजार 845 हेक्टरइतके क्षेत्र नव्याने सूक्ष्म सिंचनाखाली आल्याची माहिती कृषी विभागाच्या फलोत्पादन संचालनालयातून देण्यात आली.  केंद्र सरकारकडून योजनेसाठी 256 कोटी आणि राज्य हिश्श्याचे 170 कोटी 66 लाख रुपये मिळून आतापर्यंत तीन हप्त्यांत 426 कोटी 66 लाख रुपये प्राप्त झालेले आहेत.

त्यापैकी प्रत्यक्ष शेतकर्‍यांना 345 कोटी रुपयांचे अनुदान वाटप झालेले आहे. महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीवर सूक्ष्म सिंचनासाठी अर्ज केलेले शेतकरी, निवड झालेले शेतकरी, प्रत्यक्ष संच खरेदीसाठी पूर्वसंमती दिलेले शेतकरी, संच बसवून ऑनलाईनवर देयके अपलोड केलेले शेतकरी, अनुदान वितरित शेतकरी अशा माहितीची रोजच्या रोज तपासणी करून उपलब्ध निधी आणि केंद्राकडून येणार्‍या पुढील हप्त्यातील निधीचे वाटप मार्च महिनाअखेर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रावर कौतुकाची थाप
केंद्र सरकारने सूक्ष्म सिंचनासाठी राज्यनिहाय दिलेल्या लक्ष्यांकामध्ये दिलेल्या अनुदानाच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त रकमेचे वाटप करून देशात महाराष्ट्राने अग्रस्थान मिळविले आहे. साहजिकच उर्वरित मंजूर अनुदानाचा चौथा हप्ता मिळविण्यासाठी महाराष्ट्र पात्र ठरला आहे. त्याबद्दल नुकत्याच झालेल्या ऑनलाईन बैठकीत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव फ्रँकलिन यांनी महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे अभिनंदन करीत सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे कौतुक केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

Back to top button