डुडुळगाव गृहप्रकल्पासाठी 31 कोटींची जादा दराची निविदा | पुढारी

डुडुळगाव गृहप्रकल्पासाठी 31 कोटींची जादा दराची निविदा

पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेत डुडुळगाव येथे महापालिकेकडून प्रस्तावित असलेल्या गृहप्रकल्पासाठी अवघ्या दोन कंपन्यांनी निविदा भरली आहे. या कामासाठी स्पर्धा झालेली नाही. प्रकल्पाच्या मूळ खर्चापेक्षा तब्बल 31 कोटी रुपये जादा दराची निविदा आली आहे. दोन्ही ठेकेदार कंपन्या अगदी ठरल्याप्रमाणे दर कोट करतात, हे गंभीर आणि संशयास्पद आहे. हे जादा दराच्या निविदेचे प्रकरण ईडीकडे सोपवावे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी घेतली आहे.

त्यांनी याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. गव्हाणे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान आवास योजनेतंर्गत पालिकेच्या वतीने डुडुळगाव येथे 1190 घरांसाठी गृहप्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाची निविदा नुकतीच उघडण्यात आली. या गृहप्रकल्पाची सुमारे 142 कोटी 57 लाख रुपयांची मूळ निविदा आहे. या गृहप्रकल्पासाठी अवघ्या दोन कंपन्यांनी निविदा भरली आहे.

त्यामध्ये सर्वात कमी दर म्हणजे 173 कोटी 58 लाख रुपयांची निविदा भरणार्‍या कंपनीला हे काम मिळाले आहे. मुळात या प्रकल्पासाठी 142 कोटी 57 लाख इतका खर्च अपेक्षित असताना तब्बल 31 कोटी जादा दराची निविदा सादर झाली आहे. या कामासाठी ठेकेदारांमध्ये स्पर्धा झालेली नाही. दोन्ही ठेकेदार कंपन्या अगदी ठरल्याप्रमाणे दर कोट करतात, हेच खूप गंभीर आणि संशयास्पद आहे. प्रकल्पाच्या मूळ खर्चापेक्षा तब्बल 31 कोटी रुपये जादा दराची निविदा येते आणि प्रशासनाला त्यात काहीच गैर वाटत नाही, हेदेखील संशयाला पुष्ठी देणारे असल्याचे अजित गव्हाणे यांनी नमूद केले आहे.

ईडीकडे सोपवावे प्रकरण
शहरातील पंतप्रधान आवास योजनेच्या 31 कोटी रुपये जादा दराच्या निविदेचे प्रकरण ईडीकडे सोपवावे, अशी मागणी अजित गव्हाणे यांनी केली आहे.

पंतप्रधान आवास योजनेतील डुडुळगाव येथील गृहप्रकल्पासाठी अद्याप कंत्राटदार कंपनीला कामाचे आदेश देण्यात आलेले नाही. ठेकेदाराने किती दर भरायचे, हे आपण ठरवू शकत नाही.
                                                 – शेखर सिंह, आयुक्त, महापालिका

 

 

Back to top button