तळेगाव दाभाडे : वनक्षेत्रात जाहिरात फलकांचे अतिक्रमणे; वन विभागाचे दुर्लक्ष | पुढारी

तळेगाव दाभाडे : वनक्षेत्रात जाहिरात फलकांचे अतिक्रमणे; वन विभागाचे दुर्लक्ष

तळेगाव दाभाडे; पुढारी वृत्तसेवा : इंदोरी, जांबवडे वनक्षेत्रात जाहिरात फलकांचे अतिक्रमणे वाढत असल्यामुळे बकालपणा वाढत चालला आहे. वनपरिक्षेत्र वडगाव मावळ विभागाच्या दुर्लक्षामुळे वनक्षेत्र कमी होत चालले आहे. नोटीसला केराची टोपली श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याजवळील राखीव मोकळ्या क्षेत्रात (इंदोरी गट क्र. 408) येथे अनेकांनी व्यावसायिकांनी जाहिराती फलक लावले आहेत. वनक्षेत्र विभागाने संबंधित अतिक्रमण केलेल्या जाहिरातदारांना तातडीने नोटीस पाठविली आहे.

या वेळी काही जणांनी नोटीसचा आदर करीत जाहिरात फलक तातडीने काढले. परंतु, नोटिसांना 7-8 महिने होऊनही अनेकांनी जाहिरात फलक अद्याप काढलेले नाहीत. तर, उलट जाहिरात फलकांची संख्या वाढली आहे. शिवाय फलकांना नव्याने लाईटची सोय करण्यात आली आहे. याकडे वनक्षेत्र विभाग का दुर्लक्ष करीत आहे? असा सवाल विचारला जात आहे. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे परिसरात अनेक अनधिकृत फलक लावले जात असल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केूली जात आहे.

संबंधितांना पुन्हा नोटिसा देऊन दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, अतिक्रमण हटविण्यात येणार आहे.

                                                          – डी. एम. ढेंबरे, वनपाल

वन विभागाने नोटीस देऊन 7-8 महिने लोटले आहेत. परंतु, अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. उलट अतिक्रमणांत वाढ झाली आहे. वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कारभाराची तक्रार जिल्हा व राज्य वनक्षेत्र विभाग तसेच लोकप्रतिनिधी व वन मंत्रालयाकडे करणार आहे.

                                                      – बी. एम. भसे, व्यावसायिक

Back to top button