पुणे : फ्युज बॉक्सची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी | पुढारी

पुणे : फ्युज बॉक्सची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी

शिर्सुफळ : पुढारी वृत्तसेवा :  शिर्सुफळ (ता. बारामती) येथील सावरकरमळ्यात गट नंबर 26 मधील रोहित्रावरील फ्युज बॉक्सची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बॉक्सच्या दुरुस्तीबाबत शेतकर्‍यांनी वारंवार तक्रार करून देखील याकडे महावितरण दुर्लक्ष करीत आहे. फ्युज बॉक्स बंदिस्त नसल्यामुळे ते धोकादायक व जीर्ण झाले आहेत. या भागात आठवड्यातून तीन दिवस दिवसांचे भारनियमन केले जाते. तर रात्री कृषिपंपासाठी वीजपुरवठा केला जातो. रात्रीच्या वेळी अनेकदा तांत्रिक कारणांमुळे फ्युज उडून वीजपुरवठा खंडीत होतो.

तर फ्युज बॉक्समध्ये फ्युज नसल्याने त्याजागी तारेचा वापर केला जात आहे. रात्री महावितरणचे कर्मचारी उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकर्‍यांना जीव धोक्यात घालून फ्युज टाकावे लागत आहेत. अशावेळी फ्युजमधुन ठिणग्या पडतात. भविष्यात या ठिकाणी शेतकर्‍यांच्या जीवितास देखील या फ्युज बॉक्समुळे धोका होऊ शकतो.

तर ठिणग्या उडून उसाच्या शेताला आगदेखील लागू शकते

या नादुरुस्त फ्युज बॉक्सबाबत महावितरण्याच्या कर्मचार्‍यांना वारंवार सांगूनदेखील ते दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. एरव्ही वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून सक्ती केली जाते, मात्र दुरुस्तीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्नदेखील शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

रात्री-अपरात्री केव्हाही फ्युज उडतात. फ्युज बॉक्सची अत्यंत बिकट अवस्था झालेली आहे. महावितरणचे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आम्हाला फ्युज टाकावे लागतात. अशा नादुरुस्त फ्युज बॉक्समुळे आमच्या जीवितास धोका आहे. या ठिकाणी दुर्घटना झाल्यास त्याला महावितरण जबाबदार असेल.
                                           – दत्तात्रय शिंदे, शेतकरी, शिर्सुफळ, ता. बारामती

Back to top button