कामशेत : संपाचा झाला आरोग्य क्षेत्रावर परिणाम | पुढारी

कामशेत : संपाचा झाला आरोग्य क्षेत्रावर परिणाम

कामशेत : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपाचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे. रक्त तपासणी, ब्लडप्रेशर तपासणी, लसीकरण, सर्वे, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया आदी विभागांतील कर्मचारी संपावर असल्यामुळे सर्व सेवा विस्कळीत झाल्या आहेत. राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांचा जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संप सुरू आहे.

या संपात आरोग्य विभागातील कर्मचारीसुद्धा सहभागी झाले आहेत. यामुळे आरोग्य क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप, खोकला या आजारांच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, आता यात संपाचा परिणाम रुग्णांवर झाला आहे.

रुग्णांनी धरला खासगी दवाखान्याचा रस्ता
आरोग्य विभाग सुरू असला तरी प्रामुख्याने तेथील असणारे कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे रक्त तपासणी, ब्लडप्रेशर तपासणी, लसीकरण, सर्वे, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया इत्यादी सेवांवर याचा परिणाम झाला आहे. गंभीर आजारासाठी खासगी दवाखान्यात जावे लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात येणारी रुग्णांची संख्या घटली असून, रुग्णांना तात्पुरती सेवा मिळत आहे. स्वयंसेवी संस्था, कंत्राटी कामगार हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पाहत आहेत. त्यामुळे फक्त वैद्यकीय अधिकारी तपासून औषधे देण्याचे काम सुरू आहे. बाकी इतर सर्व कामे बंद पडले असल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

65 कर्मचारी संपात सहभागी
मावळ तालुक्यातील आरोग्य विभागात 88 कर्मचारी असून, त्यातील 65 जण संपात सामील झाले आहेत. तर, 16 कर्मचारी उपस्थित आहेत आणि 7 कर्मचारी रजेवर आहेत. यात मावळ तालुक्यात आरोग्य विभागात रिक्त जागांचे प्रमाण जास्त आहे. त्यात कर्मचारी संपावर गेल्यामुळे कामाचा अतिरिक्त भाग वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी कामगार यांच्यावर पडला आहे. शासनाने याच्यावर त्वरित तोडगा काढून रुग्णांचे होणारे हाल टाळावेत किंवा पर्यायी उपाययोजना अंमलात आणावी, अशी मागणी केली जात आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे अत्यावश्यक काम असल्याने वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेविका व कंत्राटी कामगारांना कामकाज सुरू ठेवाव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित आहेत. सर्व उपकेंद्राचे कामकाज सुरू असून, सामुदायिक अधिकारी काम पाहत आहेत.

        – चंद्रकांत लोहारे, वैद्यकीय अधिकारी, मावळ तालुका

Back to top button