पुणे : नागापूरच्या द्राक्षांना परदेशातून मागणी | पुढारी

पुणे : नागापूरच्या द्राक्षांना परदेशातून मागणी

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  नागापूर (ता. आंबेगाव ) येथील देवदत्त जयवंतराव निकम यांच्या शेतातील रेड ग्लोब या जातीच्या द्राक्षांना चीन, श्रीलंकेतून मागणी आहे. सध्या द्राक्षांची तोडणी वेगात सुरू आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी 11 एकर क्षेत्रात नागापूर येथे रेड ग्लोब या जातीच्या द्राक्षांचे पीक घेतले आहे. सध्या द्राक्षांची तोडणी सुरू आहे. या द्राक्षांना चीन व श्रीलंकेत मोठी मागणी असल्याचे निकम यांनी सांगितले.

निकम यांच्या द्राक्षबागेत गुलाबी व काळ्या रंगांचे मनमोहक द्राक्षांचे लगडलेले घड लक्ष वेधून घेत आहेत. या द्राक्षांना जागेवरच 135 रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव मिळत आहे. साधारणपणे 8 ते 18 टन द्राक्ष निर्यात केली जातात. या बागांमध्ये सध्या द्राक्षतोडणी सुरू असून, 40 ते 50 महिला-पुरुषांना रोजगार उपलब्ध झाला आहे. निकम हे द्राक्षाबरोबरच इतर पिकेदेखील चांगल्या पद्धतीने घेतात. शेती व्यवसायाकडे विशेष लक्ष देतात. त्यांनी घेतलेली पिके पाहण्यासाठी तालुक्यातून शेतकरी येत असतात. त्यांना निकम हे मार्गदर्शन करतात.

Back to top button