पुणे : संपाचा परिणाम ; ससूनमधील उपचार, तपासण्यांमध्ये घट | पुढारी

पुणे : संपाचा परिणाम ; ससूनमधील उपचार, तपासण्यांमध्ये घट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससूनमधील परिचारिका आणि कर्मचा-यांच्या संपामुळे केमोथेरपीसारखे उपचार ठप्प झाले आहेत. सीटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या तपासण्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. खासगी एजन्सीकडून 70 परिचारिका आणि वर्ग-4 चे 60 कर्मचारी रुजू करून घेण्यात आले आहेत. दरम्यान, निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण वाढत असल्याकडे मार्ड संघटनेने लक्ष वेधले आहे.
जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, या मागणीसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयातील 617 कर्मचारी आणि 774 परिचारिका संपात सहभागी झाले आहेत. रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी 500 निवासी डॉक्टर आणि नर्सिंग कॉलेजचे 200 विद्यार्थी यांनी कामाची धुरा सांभाळली आहे.

मात्र, अतिरिक्त कामाचा शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण होत असल्याचे मार्ड संघटनेचे म्हणणे आहे. ससूनमध्ये दररोज 20 ते 25 एमआरआय आणि 100 सीटी स्कॅन पार पडतात. शुक्रवारी 13 एमआरआय आणि 40 सीटी स्कॅन तपासण्या झाल्या. अनुभवी आणि प्रशिक्षित नर्स नसल्यामुळे केमोथेरपीचे उपचार तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. तातडीच्या शस्त्रक्रिया लांबणीवर पडू नयेत, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी 2 शस्त्रक्रिया केल्या.

 

रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. खासगी एजन्सीच्या साहाय्याने कंत्राटी पध्दतीने 100 ते 120 कर्मचारी आणि परिचारिका रुजू करून घेण्यात आल्या आहेत.
                                           -डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

परिचारिका आणि कर्मचा-यांचा संप असल्यामुळे कामाचा ताण वाढला आहे. 500 निवासी डॉक्टर पूर्ण ताकदीने काम करत आहेत. लवकरात लवकर काम सुरळीत व्हावे, अशी मागणी अधिष्ठाता यांच्याकडे करण्यात आली आहे.
                                                 -अमेय राऊत, सचिव, मार्ड संघटना

 

 

Back to top button