पुणे : पिकांच्या नुकसानीचे पंचनामे संपामुळे रखडणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शासकीय कर्मचार्यांच्या संपाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांसह प्रशासकीय कामकाजावर होत आहे. पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला असून, शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. परंतु, अधिकारी आणि कर्मचारी संपात सहभागी असल्याने पंचनामे रखडणार आहेत. शासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालयांनादेखील संपाचा फटका बसला आहे. मुद्रांक शुल्क कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, महावितरण कार्यालय, परिवहन कार्यालयांमधील कर्मचारी चौथ्या दिवशीही संपात सहभागी आहेत. शेतकर्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होणे अपेक्षित आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संपातील कर्मचार्यांना नोटिसा बजाविल्या आहेत. मात्र, याचा काहीच परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. संपकरी मागण्यांवर ठाम असल्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले आहेत.
कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे शेती नुकसानीचे पंचनामे करण्याची जबाबदारी नायब तहसीलदारांवर सोपविण्यात आली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने पंचनामे करून घ्यावेत, असा आदेश दिला आहे. स्थानिक शेतकर्यांनी देखील परिसरातील, गावातील माहिती तत्काळ नायब तहसीलदारांना देऊन मदत करावी.
-हिम्मत खराडे, निवासी उपजिल्हाधिकारी