पिंपरी : इतर आजारांमुळे ‘त्या’ वृद्धाचा मृत्यू; एच 3 एन 2 ची रुग्णसंख्या सातवर

पिंपरी : इतर आजारांमुळे ‘त्या’ वृद्धाचा मृत्यू; एच 3 एन 2 ची रुग्णसंख्या सातवर

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : इन्फ्लुएन्झा ए – एच 3 एन 2 ने मृत्यू झालेल्या भोसरी येथील 73 वर्षीय वृद्धाच्या मृत्यूमागे आणखीही काही प्रमुख कारणे पुढे आली आहेत. वृद्धाला फुफ्फुसाचा दुर्धर आजार, तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांचे हृदय कमकुवत झाल्याने केवळ 20 टक्के क्षमतेने काम करत होते. त्यांना एच 3 एन 2 ची लागणदेखील झालेली होती. मात्र, ते केवळ प्रासंगिक कारण असल्याचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे वृद्धाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीला आढळले आहे, अशी माहिती सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी शुक्रवारी (दि. 17) दिली.

दरम्यान, वैद्यकीय विभागाकडून शुक्रवारी प्राप्त माहितीनुसार, एच 3 एन 2 या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची शहरातील आत्तापर्यंतची एकूण संख्या सातवर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 6 रुग्ण बरे झालेले आहेत. महापालिकेने या आजारावरील उपचारासाठी नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, प्रभाकर कुटे मेमोरियल हॉस्पिटल (आकुर्डी) आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (संत तुकारामनगर, पिंपरी) येथे प्रत्येकी 10 खाटांचे आयसोलेशन वॉर्ड तयार केले आहे.

एच 3 एन 2 या आजाराच्या संसर्गाने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप आदी लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या महापालिका रुग्णालय व दवाखाना येथील वैद्यकीय अधिकार्यांचा सल्ला घ्या. या आजारावर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये औषधोपचाराची सोय उपलब्ध आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच, आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news