पुणे : रोजगारनिर्मितीसाठी ‘सागर माला’ उपक्रम महत्त्वाचा : श्रीपाद नाईक | पुढारी

पुणे : रोजगारनिर्मितीसाठी ‘सागर माला’ उपक्रम महत्त्वाचा : श्रीपाद नाईक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत सरकारने 7,517 किमी लांबीच्या किनारपट्टीच्या क्षमतेचा उपयोग करण्यासाठी ‘सागर माला’ उपक्रम सुरू केला आहे. याचा उद्देश रोजगाराच्या संधी आणि किनारपट्टीवर बंदरे, पायाभूत सुविधा विकसित करून अर्थव्यवस्थेला चालना देणे हा आहे, असे मत केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाज व जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. एमआयटी महाराष्ट्र अकादमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंगद्वारे आयोजित ‘एचआर मीट 2023’ मध्ये ते बोलत होते. श्रीपाद नाईक म्हणाले की, ‘सागर माला’ उपक्रमातून युवकांना रोजगार मिळाले आहेत. ’सागर माला’ हा उपक्रम भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक गेमचेंजर आहे. यामुळे शिपिंग आणि सागरी उद्योगांना चालना मिळेल.

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी आम्ही शिपिंगसंबंधी अभ्यासक्रम तयार केला आहे. नुकतेच एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या मॅनेट पुणेतर्फे इंडस्ट्री-अ‍ॅकॅडमी मेळावा ‘मिलीयू-23’ झाला. भारतीय सागरी व्यावसायिकांच्या इतिहासात प्रथमच मंत्री, उद्योग प्रतिनिधी, शैक्षणिक संस्था एका व्यासपीठावर आल्या होत्या.

शिपिंग क्षेत्रात अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ रोजगारासाठी शिंपिंग क्षेत्राकडे न पाहता उद्योगासाठी आणि करिअरच्या निवडीच्या दृष्टीने लक्ष द्यावे.
                                  – अमिताभ कुमार, डायरेक्टर जनरल, शिपिंग विभाग

Back to top button