वाकड : अवकाळी पावसामुळे नागरिकांची धांदल | पुढारी

वाकड : अवकाळी पावसामुळे नागरिकांची धांदल

वाकड : वाकड परिसरात सायंकाळी विजेच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाटासह वादळी वार्‍यासह पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली आणि रस्त्यावर पाणीच पाणी झाले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही वेळ रस्ते ओस पडले होते. जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर लगेच लाईट गायब झाली. सायंकाळच्या वेळेस ऑफिस सुटण्याची वेळ असल्यामुळे ऑफिसमधून घरी जाण्यासाठी एकच धांदल उडाली होती.

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक आडोशाला उभे राहून पावसापासून आपला बचाव करीत होते. काहीजण उड्डाण पुलाखाली पावसापासून बचाव करण्यासाठी थांबले होते. त्यामुळे ऑफिसमधून जाणार्‍या नागरिकांनी उड्डाण पुलाखाली गर्दी केली होती. वीज गायब झाल्यामुळे सर्व सिग्नल बंद पडले होते. त्यामुळे ट्राफिक जाम च्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागले. वाकड परिसरात पावसाचा जोर वाढल्याने परिसरातील रस्ते जलमय झाले. या जोरदार पावसाचा सर्वाधिक फटका शहरातील वाहतूक व्यवस्थेला बसला आहे.

शहरातील बहुतांशी रस्त्यावरील वाहतूक सिग्नल यंत्रणा पावसामुळे बंद पडली. अशावेळी वाहतूक पोलिसांनी वाहतूक सिग्नल व्यवस्था सुरळीत होईपर्यंत वाहतूक नियंत्रणासाठी हजर असणे अपेक्षित होते. परिणामी, वाहतूक व्यवस्था कोलमडली, सिग्नलवरच वाहनांचा गुंता निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी झाली. वाकड परिसरात महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू असून, या रस्त्यांच्या कामात मोठ्या पाईप्स रस्त्यावरच असून रस्ता उकरल्यामुळे त्याची मातीदेखील याच रस्त्यावर पडलेली आहे.

एकीकडे रस्ता बारीक दुसर्‍या बाजूला रस्त्याचे पडलेले सामान आणि नागरिकांनी उभे केलेल्या रस्त्यावरतीच गाड्या या सर्वांमुळे नागरिकांना वाहन चालवताना मात्र तारेवरची कसरत करावी लागत होती. तीच अवस्था वाकड परिसरातल्या सर्व रस्त्यांवर होती. या सर्व प्रकारात मात्र ट्रॅफिक पोलिसांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले. पाऊस थांबल्यानंतर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मात्र पावसामुळे थंडगार वारा सुखावत होता.

Back to top button