नवी सांगवी : धूळखात पडलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई | पुढारी

नवी सांगवी : धूळखात पडलेल्या वाहनांवर कायदेशीर कारवाई

नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील कांकरिया गॅस गोडाऊन येथून राजीव गांधीनगरच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याच्याकडेला पदपथाला लागून अनेक वाहने धूळखात पडून आहेत. त्यामुळे येथील परिसराला येथील परिसराला बाधा पोहचत आहे. यासंदर्भात सांगवी वाहतूक विभागाला तक्रार करूनही नागरिकांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. वरील विषयानुसार नुकतीच बुधवारी (दि. 15) ’धूळखात पडलेल्या वाहनांवर कारवाई कधी’ या शिर्षकाद्वारे बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

या बातमीची सांगवी वाहतूक पोलिसांनी त्वरित दखल घेत बुधवारी सायंकाळी 5 वाजता राजीवगांधी नगर ते कांकरिया गॅस गोडाऊन तसेच कांकरिया गॅस गोडाऊन ते मयूरनगरी चौक येथील परिसरात धूळखात पडलेल्या तेरा वाहनांवर नोटीस लावण्यात आली. तर 16 बेशिस्त पार्क केलेल्या चारचाकी वाहनांवर ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही कारवाई सांगवी वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र महाडिक, महिला पोलीस हवालदार दिक्षा तडाखे, दोन वॉर्डन बॉय यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात येत होती. यावेळी परिसरातील अनेक नागरिक दंडात्मक कारवाई होताच तसेच वाहनांवर नोटीस लावत असल्याचे दिसताच रस्त्यावर येऊन वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालत असल्याचे दिसून आले. या वेळी महिला वाहतूक पोलिस हवालदार दीक्षा तडाखे यांनी कोणतीही तमा न बाळगता कारवाईचा बडगा सुरूच ठेवत असल्याचे दिसून येत होते.

या वेळी वाहतूक पोलिसांनी सांगितले सदर धूळखात पडलेल्या वाहनांवर कायदेशीर नोटीस लावण्यात आली आहे. पाच दिवसांनी महापालिकेची मदत घेऊन वाहने न हटविल्यास येथील वाहने उचलून नेण्यात येतील. यापुढे दररोज पिंपळे गुरव येथील अशा तर्‍हेने धूळखात पडलेली वाहने शोधून त्यावर नोटीस लावून कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्नशील असणार आहे. या वेळी परिसरातील नागरिकांनी अशा बेशिस्त वाहन पार्क करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करताना पाहून तसेच धूळखात पडलेल्या वाहनांवर कायदेशीर नोटीस लावत असल्याचे पाहून आनंद झाला. अशी कारवाई यापुढेही सतत करण्यात यावी. या वेळी ‘पुढारी’ वृत्तपत्राचे तसेच सांगवी वाहतूक पोलिसांचे आभार मानले.

Back to top button