पिंपरी : मेट्रो पार्कमधील 185 झाडांचा जाणार बळी | पुढारी

पिंपरी : मेट्रो पार्कमधील 185 झाडांचा जाणार बळी

वर्षा कांबळे

पिंपरी : पुणे मेट्रोच्या उभारणीमध्ये जेवढी झाडे हटवावी लागली आहेत, त्याहून अधिक नानाविध प्रकारची झाडांनी सुसज्ज असे मेट्रो इको पार्क प्राधिकरणाच्या सेक्टर 29 साकारण्यात आले आहे; मात्र याठिकाणी निवडणूक आयोगाची इमारत होणार असल्यामुळे पार्कच्या दीड ते दोन एकर जागेतील 185 झाडांचा बळी जाणार आहे. त्यामुळे शहरातीळ पर्यावरणप्रेमींनी या घटनेस विरोध दर्शविला आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनडटीए) ने 2016 मध्ये सुरुवातीला महामेट्रो विकास कामासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई करण्याचा मार्ग म्हणून इको-पार्कच्या विकासास मान्यता दिली होती; परंतु तत्कालीन आघाडी सरकारने प्राधिकरण विसर्जित केले आहे. सेक्टर 29 मधील पाच एकर जागा प्राधिकरणाने मेट्रोला उद्यान विकसित करण्यासाठी दिली.

या पाच एकर जमिनीत मेट्रो इको पार्क साकारले आहे. हे उद्यान प्राणवायूचा स्रोत (ऑक्सिजन हब) म्हणूनही ओळखले जाते. 2017 मध्ये हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. अतिशय खडकाळ अशा जागेवर आता बहुतांश औषधी आणि देशी वृक्ष बहरले आहेत. त्यामुळे याठिकाणी जैवविविधता वाढत आहे. तसेच, या उद्यानामध्ये पक्षी, साप, मुंगूस यांचा अधिवास आहे.

पर्यावरणप्रेमींचा विरोध
निवडणूक आयोगाच्या इमारतीसाठी पाडले जाण्याचा धोका आहे, अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की पार्क ज्या जमिनीवर उभे आहे, तो भाग पुणे महापालिकेच्या मालकीचा आहे. हा मुद्दा केवळ इमारत बांधण्याचा नाही, तर या प्रक्रियेत तोडल्या जाणार्‍या महत्त्वाच्या वृक्षांचाही आहे. या परिसराच्या आजूबाजूला राहणार्‍या स्थानिकांचा व पर्यावरणप्रेमींचा यास विरोध होत आहे.

शुद्ध हवा जाण्याची भीती
परिसरातील पर्यावरणवाद्यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून दुर्मिळ प्रकारच्या वृक्षांची लागवड आणि संगोपन या उद्यानात केले आहे. गेल्या सहा ते सात वर्षांत, ही झाडे खडकाळ जमिनीवर यशस्वीपणे वाढली आहेत. ज्यामध्ये 250 प्रजातींच्या सुमारे हजार झाडांचा समावेश आहे. त्यामुळे रहिवाशांसाठी स्वच्छ हवेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. या उद्यानाने भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे.
रावेत येथील रहिवाशांनी झाडांना पाणी घालण्यापासून ते सीमाभिंत, वीज आणि पाणी पुरवठा जोडण्यापर्यंत सर्व प्रकारे उद्यानाची देखभाल व जतन करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले असल्याने त्यांनी या परिसरात बांधकामाला विरोध केला आहे.

उद्यानातील झाडे
नेवार, कडुनिंब, लावर, शिसम असे मोठे वृक्ष, हनुमानफळ, फणस, अंजीर, कवठ, आंबा, आवळा यांसारखी फळझाडे, सुगंधी झाडांमध्ये ताम्हण, सोनचाफा, बकुळ, मुचकुंद फुलझाडे तसेच कांचन बांबू, बॉटल ब्रश, ग्रीनबांबू, भोमा इत्यादी दाट झाडांची बेटे असतील. शिवाय बहावा, गुलमोहर, पांगरा, अर्जुन, सिल्वरओक अशी मोठी फुलझाडे, देशी वृक्षांमध्ये वड, पिंपळ, उंबर, आपटा अशी झाडे आहेत. उद्यानात अशा झाडांमुळे पक्ष्यांचा किलबिलाटही मोठ्या प्रमाणात आहे. झाडे आणि पक्ष्यांच्या घरांचा नाश झाल्यास पर्यावरणावर परिणाम होऊ शकत असल्यामुळे स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.

निवडणूक आयोगाची इमारतीची काही जागा इको पार्कमध्ये येत असली तरी त्यांनी शासनाने दोन्हीही प्रकल्प असल्यामुळे त्यांनी इमारतीची उंची वाढवावी, मात्र येथील झाडांचा बळी घेऊ नये. दोन दिवसांपूर्वी रानजाई प्रदर्शन झाले, त्यात खुद्द आयुक्तांनी झाडांना हात लावू नका म्हणून हाताचे ठसे घेतले आहेत. त्यांनी वृक्ष वाचविण्याचे आवाहन केले आहे. याठिकाणी तर वाढलेली झाडे तोडली जात आहेत. यासाठी हा निर्णय बदलावा.

                         – संपत शिंदे, सदस्य, मेट्रो पार्क वृक्ष बचाव समिती

Back to top button